नागपूर : मध्य रेल्वेच्या अजनी येथील इंजिन देखभाल दुरुस्ती केंद्राने (अजनी लोको शेड) कर्मचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी डब्ल्यूएजी-९ लोकोमोटिव्हमध्ये ‘वॉटरलेस युरिनल’ बसवले आहे.

नागपूर विभागांतर्गत अजनी येथील इलेक्ट्रिक लोको शेडने अजनी येथील डब्ल्यूएजी-९ गुड्स इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमध्ये युनिसेक्स वॉटरलेस युरिनल सुविधा सुरू केली आहे. आणखी ३५ इंजिनपर्यंत वाढविण्याची योजना आहे. मालगाड्या चालवणारे लोको पायलट अनेकदा सलग ७-८ तास किंवा त्याहून अधिक काळ काम करतात. त्यांना धावत्या गाडीत मूलभूत स्वच्छतेशिवाय सुविधा मिळत नाही. ऑनबोर्ड टॉयलेट सुविधांच्या अभावामुळे प्रकृती विषयी आव्हाने उद्भवली आहेत. रेल्वे इंजीनमध्ये चालक आणि सहायक चालक (क्रू मेंबर्स) असतो. त्यांना मूत्रविसर्जन करण्यासाठी दुर्गम किंवा अनियोजित ठिकाणी उतरण्यास भाग पाडते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा आणि वक्तशीरपणाशी तडजोड होऊ शकते. विशेषत: महिला लोको पायलटसाठी हा मुद्दा संवेदनशील आहे.

ही गंभीर चिंता दूर करण्यासाठी अजनी लोको शेडने २६ डब्ल्यूएजी-९ इंजिनमध्ये वॉटरलेस युरिनल यशस्वीरित्या बसवले असून, नजीकच्या भविष्यात ही सुविधा आणखी ३५ इंजिनपर्यंत वाढविण्याची योजना आहे.

नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रणालीमध्ये स्टेनलेस स्टीलवायर जाळी, परफ्यूम डिस्पेंसर आणि युरिनल मॅटसह सुसज्ज इपॉक्सी-लेपित, गंधहीन युनिसेक्स युरिनल पॉट चा समावेश आहे. यात मायक्रोकंट्रोलर-आधारित युनिट देखील आहे. जे ऑक्युपेन्सीनुसार एलईडी लाइट आणि एक्झॉस्ट फॅन आपोआप स्विच करते. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये ऑटो-सेन्सर हँड सॅनिटायझर, अतिनील-नियंत्रित जंतुनाशक प्रणाली, सेफ्टी हँड रेल आणि वाढीव व्हेंटिलेशन, स्वच्छ आणि वापरकर्त्यास अनुकूल ऑपरेशन सुनिश्चित करणे समाविष्ट आहे. महत्वाचे म्हणजे, युरिनल सिस्टमची रचना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन केली गेली आहे. जेव्हा लोकोमोटिव्ह स्थिर असेल आणि ब्रेक लावले जातील तेव्हाच ते कार्यान्वित केले जाते. त्यामुळे ट्रेन ऑपरेशन सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही याची खात्री केली जाते. लोको पायलटच्या कामाची परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने उचलेले पाऊल आहे. 

वॉटरलेस युरिनल काय आहे ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे एक इलेक्ट्रॉनिक मुत्रीघर आहे. यात मायक्रोकंट्रोलर-आधारित युनिट आहे. जे ऑक्युपेन्सीनुसार एलईडी लाइट आणि एक्झॉस्ट फॅन आपोआप स्वीच करते.  ऑटो-सेन्सर हँड सॅनिटायझर,  नियंत्रित जंतुनाशक प्रणाली, सेफ्टी हँड रेल आणि वाढीव व्हेंटिलेशन आहे. जेव्हा रेल्वे इंजीन एका जागेवर थांबलेले असेल आणि ब्रेक लावण्यात येतील, तेव्हाचे हे वॉटरलेस युरिनल कार्यान्वित होते. त्यामुळे धावत्या गाडीत इंजीन चालक, सहायक इंजीन चालकाकडून चूक होण्याची शक्यता नाही.