नागपूर : राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक रुग्ण बृहन्मुंबई, पुणे, अकोला जिल्हा व महापालिका भागात नोंदवले गेले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या आजाराचे किती रुग्ण आहेत, याबाबत आपण जाणून घेऊ या.
राज्यात १ जानेवारी २०२४ ते ७ मे २०२४ दरम्यान चिकनगुनियाचे ६०७ रुग्ण नोंदवण्यात आले होते. परंतु, यंदा १ जानेवारी २०२५ ते ७ मे २०२५ दरम्यान सारख्याच कालावधीत चिकनगुनियाचे ७१८ रुग्ण नोंदवले गेले. जिल्हानिहाय बघितल्यास पुणे, अकोला, सिंधुदुर्ग, पालघर भागात तर महापालिकानिहाय बघितल्यास बृहन्मुंबई, अकोला, सांगली, मिरज भागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. मागील दोन वर्षात या आजाराने एकही मृत्यू झाला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर या आकडेवारीला दुजोरा दिला.
चिकनगुनिया कशामुळे होतो?
चिकनगुनिया हा एक विषाणू आहे जो लोकांमध्ये डासांच्या चाव्याव्दारे पसरतो — विशेषतः एडिस इजिप्ती डास आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या माध्यमातून. जेव्हा विषाणू असलेला डास एखाद्या व्यक्तीला चावतो तेव्हा चिकनगुनियाचा संसर्ग होतो.
चिकनगुयियाचे लक्षणे काय ?
चिकनगुनिया हा चिकुनगुनिया विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे, जो प्रामुख्याने डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग मुख्यतः त्याच्या लक्षणांद्वारे ओळखला जातो, ज्यामध्ये ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि पुरळ यांचा समावेश होतो.
एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमन होते काय ?
चिकनगुनिया हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही . परंतु डास संक्रमित व्यक्तीला चावल्यावर विषाणू उचलतात. जर तुम्हाला हा संसर्ग झाला असेल, तर विषाणू इतरांना पसरू नये म्हणून नवीन डास चावणे टाळा.
चिकनगुनिया झाल्यावर काय करावे?
चिकुनगुनियाच्या रुग्णांना डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी किंवा ज्यूस प्यायल्याने शरीरातील संसर्ग दूर होण्यास मदत होते, सांधेदुखीवर चिकुनगुनियाचा सर्वोत्तम उपचार आहे आणि रुग्णाला चांगली आणि ताजी भावना देखील मिळत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणने आहे.
सर्वाधिक रुग्ण आढळलेले जिल्हे/ महापालिका १ जानेवारी ते ७ मे २०२५ दरम्यान
जिल्हा/ महापालिका | रुग्ण |
पुणे जिल्हा | ७६ |
अकोला जिल्हा | ६१ |
सिंधुदुर्ग जिल्हा | ४४ |
पालघर जिल्हा | ३८ |
ब्रृहन्मुंबई महापालिका | १०० |
अकोला महापालिका | ७८ |
सांगली-मिरज महापालिका | २० |
नाशिक महापालिका | १८ |