नागपूर : शहरात सध्या ४४१ जीर्ण इमारती आहेत. यातील २५९ इमारतींवर अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. यातील अनेक जीर्ण इमारतींमध्ये आजही लोक राहत आहेत. सर्वाधिक ९६ जीर्ण इमारती  गांधीबाग झोनमध्ये आहेत. विशेष म्हणजे, शहरातील या जीर्ण इमारतींना ऐन पावसाळय़ात नोटीस दिली जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात मंगळवारी सकाळी एक जीर्ण इमारत कोसळून त्यात १९ लोक मृत्युमुखी पडले तर अनेक लोक जखमी झाले. त्यामुळे आता शहरातील जीर्ण इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या परिपत्रकानुसार, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळय़ापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबत महापालिकेने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यावर गेल्यावर्षी महापालिका क्षेत्रातील विविध प्रवर्गाच्या इमारतींचे झोननिहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात शहरात अजूनही २५९ इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, त्यात अतिधोकादायक  व तात्काळ निष्कासित करावयाच्या ९७ इमारती आढळल्या आहेत.

त्यातील  बहुतांश जीर्ण इमारती मालक आणि भाडेकरू यांच्या वादात अडकल्या असून अशा जीर्ण इमारतींची संख्या ५२ आहे. यातील काही इमारती दुरुस्त करण्याजोग्या नसल्याने त्या पाडण्याशिवाय पर्याय नाही. आजही अनेक नागरिक धोकादायक इमारतीमध्ये राहत असून महापालिका प्रशासनाकडून मात्र त्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.

मॉडेल मिल चाळ राहण्यायोग्य नाही

गणेशपेठ परिसरातील मॉडेल मिल चाळीतील अनेक घरे जीर्ण अवस्थेत असून त्या ठिकाणी राहण्यायोग्य स्थिती नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून  नोटीस देण्यात आल्या आहेत. या चाळीचे  प्रकरण गेल्या काही दिवसांपासून न्यायप्रविष्ट असल्यामुळे कारवाई करणे शक्य नसल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले.

जीवित व वित्त हानी होण्याचा धोका

पावसाळय़ामध्ये धोकादायक इमारती किंवा घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. अशा इमारती किंवा घरांचा वापर केल्यास जीवित व वित्त हानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक इमारती किंवा घरांमध्ये रहिवास किंवा वापर करणे तात्काळ थांबवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.