नागपूर : खड्ड्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात जीपीएस लोकेशनसह खड्ड्यांच्या फोटोचे सांकेतिक प्रदर्शन भरवून आंदोलन केले. तसेच महापालिका युक्तांना खड्डे बुजवण्यासाठी आठ दिवसांचा मुदत दिली आहे.
शहरातील रस्त्यावर दिवसेंदिवस पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास या विरोधात काँग्रेसने सोमवारी आक्रामक आंदोलन केले. प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस केतन विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकान मुख्यालयासमोर “खड्ड्यांचे प्रदर्शन’ लावण्यात आले.
या प्रदर्शनात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे मोठ्या फ्लेक्सवर दर्शवण्यात आली. विशेष म्हणजे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांचे जीपीएस लोकेशनसह सप्रमाण पुरावे मनपा प्रशासनासमोर सादर केले. अशा प्रकारचे पुरावे प्रथमच सादर केल्याने या आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण छाप उमटली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “नागपूर तुला एनएमसीवर भरोसा नाय का?” अशा विडंबनात्मक घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यांची दयनीय अवस्था आणि महापालिका प्रशासनाची निष्क्रियता उपरोधिक शैलीत मांडण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना बॅरिकेटमागे रोखण्याचा बलपूर्वक प्रयत्न केला. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिकेटिंगवर चढून घोषणाबाजी केली. अखेर केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात काँग्रेसने शहरातील सर्व खड्ड्यांची जीपीएस लोकेशनसह माहिती सुपूर्द केली. तसेच, आठ दिवसांत खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महापालिका आयुक्तांना दिला आहे.
या आंदोलनावेळी बोलताना केतन ठाकरे म्हणाले, ‘नागपूरच्या खड्ड्यांचा प्रश्न नागरिकांच्या जीवाशी निगडीत गंभीर प्रश्न बनला आहे. दररोज अपघात होत आहेत, आरोग्यावर परिणाम होत आहे. महापालिका प्रशासनाने फक्त कागदी कामं व आकडेवारी मांडण्यापेक्षा तातडीने ठोस उपाययोजना करावी. आम्ही आयुक्तांकडे पुराव्यासह निवेदन दिले आहे. जर आठ दिवसांत दुरुस्ती झाली नाही, तर काँग्रेस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल. हा प्रश्न गांभिर्याने घेतला नाही तर येत्या काळात मनपा अधिकार्यांचे फोटो खड्ड्यांमध्ये लावले जातील.’
या आंदोलनात स्नेहा निकोसे, भावना लोणारे, सरस्वती सलामे, प्रमोद ठाकूर, देवेंद्र रोटेले, शैलेश पांडे, अभिजीत झा, रिजवान रुमवी, रोहित यादव, वसिम खान, नितीन माहुरे, राजेश गोपाले, सत्यम सोडगीर, बंडू ठाकरे, श्याम सोनेकर, करुणा घरडे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अभिषेक उसरे, मोहनिश चांदेकर, साक्षी राऊत, रक्ष्मी उईके, समीर राय, ओम तिवसकर, ओमकार उमाटे, युगल विदावत, अनुराग राऊत यांसह शेकडो कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.