अनिल कांबळे

पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मनोरूग्णाच्या मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या चौकशीअंती सक्करदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार, हवालदारासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सीआयडीचे पोलीस उपाअधीक्षक सुरेंद्र धुमाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत पांडूरंग सीद, पोलीस हवालदार कैलास दामोदर, मेहरास सर्फुद्दीन शेख, युसूफ हसन खान, अनवर हुसैन जिगरीभाई तसेच एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.

१६ ते १८ डिसेंबर २०१९ दरम्यान ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा ताजबाग परिसरात घडली होती. उत्तरप्रदेशातील बलरामपूर जिल्ह्याच्या उत्तरला तहसीलमधील जैलिया गजपूर येथील रहिवासी मो. फैजान (वय ३६) हा व्यक्ती मनोरूग्ण होता. तो ताजबाग येथे आला होता. घटनेच्या दिवशी तो विक्षिप्तपणे वागू लागल्याने त्याला धार्मिक स्थळावरील सुरक्षा रक्षक मेहरात सर्फुद्दीन शेख, युसूफ हसन खान, अनवर हुसैन जिगरी भाई आणि आणखी एका व्यक्तीने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. सक्करदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत पांडूरंग सीद, हवालदार कैलास दामोदर घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी फैजान अहमदला दोरीने बांधून बेदम मारहाण केली.विशेष म्हणजे तो मनोरुग्ण असल्याची माहिती होती. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार करण्याची गरज होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यातच त्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सीआयडीला देण्यात आले. त्यांनी चौकशी करून तत्कालीन ठाणेदार अजीत सीद, हवालदारासह ७ जणांवर गुन्हे दाखल केले.