नागपूर : घरगुती विजेवर दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येत असली तरी, आता ई-चार्जिंग स्टेशन्समुळे कमी वेळेत जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल ११८ तर वर्धा जिल्ह्यात २२ महावितरणचे चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांसाठी इलेक्ट्रिक वाहने एक उत्तम पर्याय आहे. सुरुवातीला या वाहनांना ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु, मागील तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे महावितरणचे नागपूर परिमंडळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सचे जाळे वेगाने विस्तारत आहे. आता नागपूर जिल्ह्यात ११८, तर वर्धा जिल्ह्यात २२ ठिकाणी ई-चार्जिंगची सोय उपलब्ध झाली आहे.
महावितरणच्या चार्जिंग सेंटरवर जलद वाहन चार्ज होत असल्याने लांबच्या प्रवासाचा बेत असलेल्या ई- वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील ११८ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सपैकी कळमेश्वर येथे १, कामठी येथे ४, कन्हान, कोंढाळी, रामटेक आणि सावनेर येथे प्रत्येकी ३, खापरखेडा आणि मौदा येथे प्रत्येकी ५ स्टेशन्स आहेत. बुटीबोरी आणि एमआयडीसी भागात प्रत्येकी ९, तुळशीबाग येथे १०, हिंगणा, इतवारी आणि मानेवाडा येथे प्रत्येकी १, सिव्हिल लाईन्स, हुडकेश्वर, त्रिमूर्तीनगर आणि वर्धमाननगर येथे प्रत्येकी ७, लष्करीबाग आणि नंदनवन येथे प्रत्येकी ३, रिजंट उपविभागात ११ आणि शंकरनगर उपविभाग भागात ६ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध आहेत.
महावितरणची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती
शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरवण्यासाठी महावितरणला ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त केले आहे. शासनाने राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरणही जाहीर केले आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यांसारखी सहा मोठी शहरे प्रदूषित मानली जातात. या शहरांमध्ये मागणीनुसार ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी वीज जोडणी महावितरणकडून दिली जात आहे.
महावितरणचे म्हणने काय?
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी आवश्यक असणारी सर्वंकष सुविधा महावितरणतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासगी कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स, सार्वजनिक परिवहन सेवा, निवासी संकुल आणि वैयक्तिक ग्राहकदेखील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतात आणि यासाठी लागणारी तांत्रिक मदत महावितरणकडून पुरवली जाईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.