नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अडकलेले अनेक शिक्षक कधीही शाळेत न जाता वेतन उचलत असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. नागपूरच्या गायत्री प्राथमिक शाळेत काटोल तालुक्यातील दोन शिक्षिकांची नियुक्ती असताना त्या कधीही शाळेत गेल्या नाही. पण, अनेक वर्षांपासून वेतन उचलत होत्या. यातील एका महिलेने निवडणूकही लढवली, असे सांगून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या दोन शिक्षकांमधील एक ही सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या नेत्याची पत्नी आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आलेलं आहे.
नागपूर जिल्ह्यात बनावट शालार्थ आयडी तयार करून मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली. यात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. अनेक शाळांमध्ये नियुक्त झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत न जाता अनेक वर्षांपासून वेतन उचलत होते. या घोटाळ्याच्या चौकशीनंतर सर्वच शिक्षकांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
अनिल देशमुख यांच्या तक्रारीनुसार, काटोल तालुक्यातील दोन राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पत्नीचा या घोटाळयात समावेश आहे. या दोन्ही शिक्षिकांच्या नियुक्तीदरम्यान कोणतीही शासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, शिक्षक पदासाठी आवश्यक शिक्षणही त्यांनी पूर्ण केलेले नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे सहायक शिक्षक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे या दोघांच्या नियुक्तीबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
प्रश्न काय?
- गायत्री प्राथमिक शाळेने शिक्षक नियुक्तीसाठी कोणत्या वृतपत्रामधून जाहिरात दिली?
- नियुक्ती करताना त्यांची कोणती कागत्रपत्रे घेण्यात आली व त्याची शहनिशा करण्यात आली का?
- यातील एका शिक्षिकेने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताना गायत्री प्राथमिक शाळेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले होते का?
- शालार्थ आयडी मिळण्यापूर्वी संबंधिताने तीन वर्षे शिक्षक सेवक म्हणून काम केले होते का?
- एसआयटीमार्फत या दोन्ही शिक्षिकांची चौकशी कधी होणार?