नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या शहरात वाढत जाणाऱ्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलले आहे. पूर्वी घडणाऱ्या संघटीत गुन्हेगारांच्या टोळी युद्धाला वर्चस्वाचे कारण होते. आता त्याची जागा ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीतून वाढलेल्या वैराने घेतली आहे. याच वैरातून गुरुवारी भल्या सकाळी एका कुख्यात गुंडाचा प्रतिस्पर्धी गँगने गेम केला.

प्राणघातक हल्ले, खून, लूटमार, दमदाटी, हाणामाऱ्या, खंडणी, बलात्कार, अंमली पदार्थ तस्करी, अपहरणासारखे ३५ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड समीर शेख उर्फ येडा शमशेर खान याचा गुरुवारी पहाटे सहा जणांनी सूड उगवला.

राजीव नगरातल्या गांधी नगर उड्डाणपुलाच्या खाली हल्लेखोरांनी कुऱ्हाडी आणि बेसबॉल बॅटने त्याच्या देहाच्या चिंधड्या करीत खून केला. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले. प्रकरणात यशोधरा नगर पोलिसांनी अब्दुल फईम उर्फ चुहा वल्द हनीफ शेख, शेख अफसर उर्फ अस्सू शेख सत्तार, शुबू, साहेबा, इस्तियाक काल्या आणि अक्षय या अशा ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सुरू केला आहे.

समीर येडा हा यशोधरा नगर पोलीस हद्दीत ड्रग्ज आणि गांजा तस्करीसाठी कुप्रसिद्ध होता. स्पर्धा आणि वर्चस्वामुळे परिसरातल्या काही टोळ्या त्याच्या मागावरच होत्या. गुरुवारी पहाटेच्या समीर मोमिनपुरातील सासरवरून घरी परतत असल्याची माहिती मिळताच अस्सू आणि त्याच्या ५ साथिदारांनी गुरुवारी पहाटे समीरवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी कुऱ्हाडी आणि बेसबॉल बॅटने त्याचा खून करीत पळ काढला. समिरचा भाऊ मोहम्मद शहजाद समशेर खान याच्या फिर्यादीवरून यशोदरा नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत फरार सहा आरोपींचा शोध सुरू केला आहे.

यशोधरा नगरात समीरचा उच्छाद

समीरने राजीवनगरात गेल्या काही वर्षांपासून उच्छाद मांडला होता. आपसातल्या वादांमधून तो अनेकदा कोणालाही मारझोड करायचा. सनकी असल्यानेच त्याचे नाव येडा म्हणून कुख्यात झाले होते. त्यामुळे समिर येडा याने आपल्याच वागणूकीमुळे वैरी तयार केले होते. गुन्हेगारी वृत्तीत कसलीही सुधारणा होत नसल्याने पोलीसांनी त्याला यापूर्वीही दोन वेळा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले होते. यशोधरा नगर, कपीलनग, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या समिर येडा याच्या विरोधात ३५ हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.