नागपूर : माता कचेरी परिसरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात (आरोग्य सेवा कार्यालय) एका भागातील स्लॅबचा तुकडा पडला. काही दिवसांपूर्वीच्या या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी प्रशासनाला येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कार्यालय इतरत्र स्थानांतरित करण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील सुप्रसिद्ध दीक्षाभूमीच्या शेजारी माता कचेरी परिसरात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व रुग्णालये व कार्यालयांना नियंत्रित करणारे आरोग्य उपसंचालक कार्यालय आहे. हे कार्यालय हेरिटेज इमारतीत आहे. या इमारतीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्रशिक्षणाशी संबंधीत विविध कार्यालये, आरोग्य उपसंचालकांसह इतरही अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या इमारतीची दिवसेंदिवस दूरवस्था होत असून तातडीने दुरुस्तीसाठी वारंवार प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) पत्र दिले गेले.
पीडब्ल्यूडी विभागाकडून मध्यंतरी काही थातूरमातूर कामही केले गेले. परंतु, आजही येथील चुन्याचे स्लॅब सागवनच्या बल्लीवर आहे. चुन्याचा थर हळूहळू खालच्या दिशेने येत असल्याने ही इमारत खिळखिळी होत आहे. त्यामुळे हा स्लॅबचा तुकडा पडून अनुचित प्रकार घडण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी पावसाच्या तडाख्यात येथील हा तुकडा कर्मचाऱ्यांच्या टेबलावरच पडला. यावेळी येथे कुणीही नसल्याने दुदैवी घटना घडली नाही. त्यानंतर येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर दुसरीकडे पीडब्ल्यूडीकडूनही आरोग्य विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देत ही इमारत धोकादायक असून येथे अनुचित घडना घडल्यास आम्ही जवाबदार राहणार नाही, असे स्पष्ट केले गेले. त्यानंतर आरोग्य विभागाने हे कार्यालय आतील एका इमारतीत हलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांत सापांची दहशत
राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कार्यालय परिसरात रोजच साप निघत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांची दहशत कमी करण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर आहे. हा भाग खोलगट परिसरात असल्याने येथे पाणी तुंबून नुकसान झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.