नागपूर : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागपूरकरांना गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुखद भेट दिली आहे. सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत कायम होता. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा उपराजधानीकरांना अनुभवायला मिळाला. मंगळवारी देखील सूर्यनारायण ढगांमधून डोकावू पाहात असला तरीही ढगांनी त्यावर सरशी केली आणि पुन्हा एकदा पाऊस कोसळला.
पावसाने शहर ओलेचिंब झाले असताना हा पाऊस महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल करीत आहे. अचानक कोसळणारा आणि अचानक थांबणारा पाऊस नागपूरकरांची चांगलीच दमछाक करतो आहे. भररस्त्यात रेनकोट घालून थोडे अंतर दूर जात नाही तोच पाऊस थांबतो. तरुणाई मात्र या पावसाचा चांगलाच आनंद लुटत आहे. शहरातील फुटाळा, अंबाझरी या दोन्ही तलावांवर या पावसाळी आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेणा-यांमध्ये तरुणाई अधिक आहे.