नागपूर: कधीकाळी हिरवे नागपूर अशी ओळख असलेल्या शहरात आता नजर जाईल तेथे सिमेंटचे जंगल नजरेस पडते. अशातही काही जागा त्यांचे हिरवेपण राखून होत्या. त्यापैकीच सोनेगाव तलावाजवळील भोसलेकालीन आमराई एक होती. परंतु, आता तेथून रस्ता तयार झाल्याने वाढलेल्या वर्दळीमुळे आमराई ओसाड होण्याच्या मार्गावर आहे.

सहकारनगर स्मशानघाटापासून ते नागपूर फ्लाईंग क्लबपर्यंत पसरलेल्या या हिरव्याकंच वनराईची वाटचाल आता ओसाड जंगलाकडे सुरू झाली आहे. मुळात ही जुनी राजे भोसल्यांची जागा. तेथे असणाऱ्या डेरेदार आंब्याच्या झाडांमुळे हे जंगल त्या काळात ‘आमराई’ म्हणून प्रसिद्ध होते. पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत ही जागा वायुसेनेच्या ताब्यात होती. त्यांचे सुरक्षा रक्षक सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवेशद्वारावर उभे असायचे. कोणालाही या जागेत विनाकारण प्रवेश देत नसत. फक्त परिसरातील लोकांनाच सकाळी नऊपर्यंत फिरण्याची मुभा होती. या निर्बंधामुळे या वनराईचे सौंदर्य कायम होते. पहाटे फिरायला जाणाऱ्यांनाही या रम्य परिसरातून फिरण्याचा आनंद मिळत होता. दरम्यान, वाढत्या शहरीकरणामुळे हळूहळू हे जंगलही लोकांच्या नजरेतून सुटले नाही. पाच ते सहा वर्षांपूर्वी वर्धा मार्गावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत होती. विशेषत: विमानतळावर जाण्यास किंवा विमानतळावर उतरलेल्या अतिविशेष पाहुण्यांना (मंत्री) शहरात प्रवेश करताना अडचणी येत असल्याने पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाला. वायुसेनेच्या ताब्यात असलेली ही जागा विमानतळ्याच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर सहकारनगर स्मशानघाट ते नागपूर फ्लाईंग क्लब परिसरातून रस्ता तयार केला. तो वाहतुकीसाठी सुरू केला. या मार्गाने विमानतळाकडे जाणे सोयीचे ठरू लागल्याने वाहनांची वर्दळ वाढली. आज या जागेमधे लोकांची ये-जा प्रचंड वाढली आहे. युवक-युवतींसाठी ही जागा ‘पिकनिक स्पॉट’ ठरत आहे. लोकांचा राबता वाढल्याने जागोजागी प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या दिसतात. परिणामी, इथले हिरवेपण हळूहळू कमी होत चालले आहे.

गेल्या २५ वर्षांमध्ये जितके जिवंत साप दिसले नव्हते त्यापेक्षा जास्त मेलेले साप गेल्या पाच वर्षांमधे येथे नजरेस पडले, अशी प्रतिक्रिया या रस्त्याने पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी दिली. पूर्वी या भागात मोर दिसायचे आता वाहनांच्या आवाजाने ते दिसणेही बंद झाल्याचे नागरिक सांगतात. कधीकाळी प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या या भागात रस्ता सुरू झाल्यावर लोक खूप आतमध्ये बिनधास्तपणे शिरतात. येथील पूर्वीचे शांत फिरण्यालायक वातावरण आता नष्ट झाले आहे आणि मुख्य म्हणजे ज्या विमानतळाच्या अधिकारात ही जागा येते त्यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. वर्धा मार्गावर मेट्रोचे काम सुरू होते तेव्हा वाहतूक कोंडी होत होती. पण, आता मेट्रो धावू लागली आहे. डबल डेकर पूल सुरू आहे. विमानतळापर्यंत जाण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध आहेत. असे असतानाही हा रस्ता अजूनही वाहनांसाठी मोकळा ठेवण्यात आल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वीचे हिरवे सौंदर्य या जागेला पुन्हा लाभेल का ?

एकेकाळी फिरण्यासाठी नागपूर शहरामध्ये इतकी सुंदर जागा नव्हती. पण, आता असे म्हणणे कठीण होत चालले आहे. ते पूर्वीचे हिरवे सौंदर्य या जागेला पुन्हा लाभेल का, शंकाच आहे. – अशोक मासोदकर