नागपूर : ऑपरेशन थंडर अंतर्गत परिमंडळ पाचच्या पथकाला अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क उध्वस्त करण्यात गुरुवारी यश आले. तस्करांची एकेक कडी जोडत पोलिसांनी तब्बल २२४ ग्रॅम मेफोड्रिन अंमली पदार्थांसह पाच तस्करांना अटक केली. या तस्करांकडून जप्त अंमली पदार्थांची बाजारातील अंदाजे किंमत ३४ लाख असल्याची शक्यता आहे. चारही तस्करांकडून पोलिसांनी दोन कार आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरून एका महिलेने हा अंमली पदार्थ तस्करी करून नागपुरात आणणे होते. ही सूत्रधार महिलाही पथकाच्या हाती लागली आहे. चालू वर्षात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
कळमना ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड हे मंगळवारी मिनीमाता नगरात गस्तीवर असताना त्यांना मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास मोकाट फिरत असलेल्या एका कारवर संशय आला. त्यांनी पाठलाग करत कारची झडती घेतली असता डॅशबोर्डमध्ये लपवून ठेवलेले ५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ हाती लागले. पोलीसांनी कारचा चालक अमित लज्जाराम शर्मा (४४, रा. दारोडकर चौक) याला अटक केली. त्याच वेळी पथकाने लाल रंगाच्या आणखी एक कारची झडती घेतली. तीत पोलिसांना १५ लाख रुपयांची रोकड हाती लागली. पोलिसांनी मुकेश निरंजन तराळे (४७, वसंत नगर) याला बेड्या ठोकल्या.
अमित शर्माने हा अंमली पदार्थ कोतवालीतल्या आयुष इंगोलेकडून खरेदी केल्याचे सांगितल्याने. पथकाने इंगोलेच्या घरावर पाळत ठेवली. बुधवारी तो घरी येताच पथकाने तिथे छापा टाकला. पोलिसांना पाहून आयुष इंगोले पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे २१९ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ हाती लागले. आयुषने हे अमंली पदार्थ मयुर प्रकाश ठवकर (२१, वाठोडा) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. पथकाने त्याला सापळा रचून गंगाबाई घाट परिसरातून अटक केली.
गुजरातमार्गे नागपूर आले ड्रग्ज
शहरात अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये महिला सूत्रधार आढळली आहे. गुजराजच्या समुद्रकिनारपट्टीवरून तिला हा अंमली पदार्थ पोचवला गेला होती. त्यासाठी ती गुजरातलाही जाऊन आली आहे. तेथून रस्ता मार्गाने ही महिला नागपूर आल्याचे सुगावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. ती कुठल्या मार्गे नागपूरात आली आणि वाटेत तीने आणखी कोणाला अंमली पदार्थ पोचवला का याचाही आता पोलीस शोध घेत आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणातला एमडी अंमली पदार्थाची तस्करी शोधण्यात कळमना टीमने महत्त्वाचे काम केले आहे. गुजरात समुद्र किनार पट्टीवरून हा अंमली पदार्थ नागपूरात आल्याचे काही धागेदोरे सापडले आहेत. हा अंमली पदार्थ नागपुरात आणणारी सूत्रधार महिला आहे. ही तस्कर महिलाही कोतवालीतून पोलिसांच्या हाती लागली आहे. तीच शहरातल्या अंमली पदार्थ तस्करीची सूत्रधार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यात आणखी काही जणांचा पथक शोध घेत आहे. -निकेतन कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५