नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वसतिगृहात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार दिल्लीतील ॲन्टी रॅगिंग समितीच्या मदत क्रमांकावर करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतून मेडिकलला ही तक्रार वर्ग होताच प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे. दिल्लीतील ॲन्टी रॅगिंग समितीच्या मदत क्रमांकावर झालेल्या तक्रारीनुसार मेडिकलच्या वसतिगृह क्रमांक ५ मध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मान खाली घालून उभे करणे, रात्री-बेरात्री मुलांना झोपेतून उठवून त्रास देण्यात येत असल्याचे नमूद आहे.

दिल्लीतून ही तक्रार मेडिकल प्रशासनाकडे वर्ग होताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. तातडीने २० सप्टेंबरला मेडिकलमध्ये ॲन्टी रॅगिंग समितीची बैठक घेतली गेली. त्यापूर्वीच मेडिकल प्रशासनाकडून वसतिगृहातील १०७ वरिष्ठ विद्यार्थी आणि ८२ एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची एक-एक करत चौकशी केली गेली. प्राथमिक चौकशीत येथील एकाही विद्यार्थ्याने रॅगिंग झाली नसल्याचे लेखी दिले आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून आवाहन करून विद्यार्थ्यांना एक-एक करत माहिती विचारत कुणाची रॅगिंग झाली असल्यास पुढे या, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे सांगत दोषींवर कारवाईचे आश्वासनही दिले जात आहे. त्यानंतरही कुणीही रॅगिंग झाल्याचे मान्य करायला तयार नाही.

हेही वाचा : वाशीम: वीज पडून महिलेचा मृत्यू, चार जनावरेही दगावली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेडिकल प्रशासनाकडे रॅगिंगबाबत तक्रार आल्यावर येथील ॲन्टी रॅगिंग समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत येथे कोणतीही रॅगिंग झाली नसल्याचे दिसत आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांकडून जबाब घेतला जात आहे. प्रशासनाने येथे रॅगिंग होऊ नये म्हणून आवश्यक काळजीही घेतली आहे’, असे नागपूर मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राज गजभिये यांनी म्हटले आहे.