नागपूर : शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील मिहान परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने या परिसरात दहशत पसरली आहे. यापूर्वीदेखील या परिसरात बिबट्याचा वावर आढळला होता. दरम्यान, वनखात्याची चमू या परिसरात गस्तीवर असून कॅमेरा ट्रॅप्स देखील लावण्यात आले आहे. या परिसरात कारमधून जाणाऱ्या तरुणांना रात्री टीसीएसच्या भींतीजवळ हा बिबट दिसला आणि त्यांनी तो कॅमेऱ्यात कैद केला.

मंगळवारी समाजमाध्यमावर मिहान परिसरात बिबट फिरत असल्याची एक चित्रफित सामाईक झाली होती. मिहानचा हा परिसर हिंगणा, बुटीबोरी आणि सेमिनरी हिल्स अशा तिनही वनक्षेत्रात येतो. त्यामुळे घटनेची खात्री पटल्यानंतर सकाळी हिंगणा वनक्षेत्राची चमू या परिसरात बिबट्याच्या शोधासाठी गेली. तर सायंकाळी बुटीबोरीची चमू या परिसरात पोहोचली.

मिहान परिसरातील टीसीएसजवळ हा बिबट फिरत असल्याचे चित्रफितीत दिसून आले. या परिसरात एम्ससारखे मोठे रुग्णालय तसेच इतर अनेक महत्त्वाच्या कंपन्या आणि कार्यालये आहेत. बिबट्याच्या अस्तित्त्वामुळे याठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. यापूर्वीदेखील मिहान परिसरात वाघ आणि बिबट्याचा वावर आढळला होता. तर २०२१ साली शहराच्या आयटी पार्क परिसर, कृषी महाविद्यालय ते महाराजबाग असाही बिबट्याने प्रवास केला आहे.

दाभा परिसरात देखील अनेकदा बिबट आढळला आहे. शहरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मिहानमध्ये यापूर्वीही २०१२ साली बिबट्याचे वास्तव्य आढळून आले. वनखात्याने त्यावेळी बिबट्याला शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण अंधाराचा फायदा घेत बिबट तेथून पसार झाला. त्यानंतर २०१९ साली देखील या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळला होता. त्यावेळी वाघ की बिबट असा संभ्रम निर्माण झाला होता. कारण सुरुवातीला पावलांचे ठसे आढळून आले होते. तर त्यावेळी लोकांनी वाघ असल्याचेच सांगितले. मात्र, वनखात्याच्या चमुने तो वाघ नाही तर बिबट असल्याचे सांगितले.

मिहानपासून बोर व्याघ्रप्रकल्प जवळच असून गेल्या काही वर्षात याठिकाणी वाघ तसेच बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी वर्धा मार्गावर झरी परिसरातील पलोटी महाविद्यालयाजवळ बिबट आढळला होता. नंतर तो रस्ता ओलांडून जामठ्याच्या दिशेने रवाना झाला. आधी बिबट मुंबईत गोरेगाव परिसरात असायचे. त्यानंतर नाशिकमध्येही बिबट्याने बस्तान बसवले. आता तर गेल्या काही वर्षात नागपूर शहर बिबट्यांना आवडायला लागले की काय अशी परिस्थिती आहे. नागरिकांमध्ये मात्र, भीतीचे वातावरण आहे.