नागपूर : दोन विमान देखभाल दुरुस्ती केंद्रे (एमआरओ), ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर कारखाना, फाल्कन-२००० जेट्स विमानाची नागपुरात निर्मितीबाबत झालेला करार लक्षात घेता उपराजधानीची वाटचाल एव्हिएशन सामुग्री उत्पादन हबच्या दिशेने सुरू झाली. तर दुसरीकडे १३ पैकी एकाही तालुक्यात मोठा उद्योग नसल्याने ग्रामीण भागात रोजगार समस्या निर्माण झाली आहे. तेथील युवकांचे स्थलांतर शहराकडे होत होते.
प्रसिद्ध नागपुरी संत्रीचे उत्पादन ग्रामीण भागात होत असताना त्यावर प्रक्रिया करणारा उद्याोग मात्र शहरात सुरू केल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाढला आहे. विकासाचा झगमगाट फक्त शहरापुरता मर्यादित आहे. ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षणाच्या उत्तम सुविधांची गरज आहे. ट्रिपल आयआयएम, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यासारख्या राष्ट्रीय शिक्षण संस्था, एम्स, शासकीय वैद्याकीय महाविद्यालये व रुग्णालये, त्याला खासगी वैद्याकीय महाविद्यालयांची मिळालेली जोड यामुळे शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात नागपूर अग्रस्थानी आहे.
आता जिल्ह्याची वाटचाल हवाई उड्डाण क्षेत्रातील सामुग्री उत्पादन उद्याोगांचे हब या दिशेने सुरू झाली आहे. मागील काही वर्षांत नागपूरमध्ये मिहान आणि विशेष आर्थिक क्षेत्रात हवाई क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागल्या आहेत. सध्या मिहानमध्ये एअर इंडिया आणि एएआर-इन्दमार या कंपन्यांची प्रत्येकी एक अशी दोन विमान देखभाल दुरुस्ती केंद्रे आहेत. देशाचे मध्यवर्ती ठिकाणी नागपूर असल्याने विविध कंपन्यांना त्यांची विमाने येथे दुरुस्त करणे सोयीचे ठरते. त्यामुळे शासनाने या भागात गुंतवणूक यावी म्हणून सवलती उद्योगांना दिल्या.
‘मॅक्स एरोस्पेस’चा प्रकल्प
सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्राच्या उद्याोग विभागात करार झाला.
फाल्कन२००० जेट्सची निर्मिती
डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन-२००० जेट्सच्या निर्मितीसाठी करारही मागच्याच आठवड्यात झाला. या विमानांची निर्मिती नागपुरात होणार आहे.
संत्री उत्पादन प्रक्रिया शहरात
नागपूरच्याच मिहान- विशेष आर्थिक क्षेत्रात पतंजली उद्याोग समूहाचा फूड पार्क सुरू झाला. येथे प्रति दिन ८०० टन संत्र्यांवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. परंतु तो शहरात आहे. शेतातून कारखान्यात संत्री आणण्याचा वाहतूक खर्च वाढला.
ग्रामीण भागात मोठ्या उद्योगाची गरज
नागपूर जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. यापैकी नागपूरला खेटून असलेला बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर तालुका वगळता एकाही तालुक्यात मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात एकूण २०२१ छोटे-मोठे कारखाने आहेत. त्यापैकी १०१४ सुरू आहेत. यापैकी बहुतांश शहरातच आहेत. जिल्ह्यात कामगारांची संख्या ७४१३० आहे. काटोल, सावनेर हे मोठे आणि शेतीवर अवलंबून असणारे तालुके आहेत. येथे तालुका मुख्यालयी एकही कारखाना किंवा उद्योग नाही. रामटेकमध्ये पर्यटन व्यवसायाला संधी असतानाही पुरेशा सुविधांअभावी हे शहर दुर्लक्षित राहिले.