नागपूर : मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने विमानसेवा तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून सोमवारी सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचणारे इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान रद्द करण्यात आले आणि आणखी एक विमान चार तास विलंबाने आले. तर मुंबईहून येणारी विदर्भ एक्सप्रेस आज तब्बल १२ तास आणि दुरान्तो एक्सप्रेस चार तास विलंबाने नागपुरात पोहचली.

मुंबई पावसाने तुंबल्याने इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ई ८०४ हे मुंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. हे विमान मुंबईहून सकाळी ७.४५ वाजता उड्डाण भरून नागपूर येथे सकाळी ९.१५ वाजता पोहचणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे विमान वेळेवर रद्द करावे लागले. त्याचप्रमाणे इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ई ५१२४ हे विमान ४ तास २१ मिनिटे विलंबाने मुंबईहून नागपूर येथे पोहचले. नियोजित वेळापत्रकानुसार विमान मुंबई येथून सकाळी ६.१० वाजता उडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या विमानाने सकाळी १०.१५ वाजता नागपूरच्या दिशेने उड्डाण भरले. परिणामत: सकाळी ५ वाजतापासून घरून निघालेल्या प्रवाशांना पाच तास मुंबई विमानतळावर बसून राहावे लागले. तर इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ई ६१४५ विमान नागपूर येथून सकाळी ८.१५ वाजताऐवजी दुपारी १२.३३ वाजता मुंबईकडे उडाले. फ्लाइट क्रमांक ६ई ५००२ विमान ४१ मिनिटे विलंबाने मुंबईला पोहचले.

हेही वाचा : Video: बछड्यांसह वाघीण निघाली ऐटीत….पण, भररस्त्यात असे काही घडले की चवताळून थेट पर्यटकांवर…

इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ई ७४२७ विमान इंदूरहून सकाळी ०७.०५ वाजताऐवजी सकाळी ०७.२९ वाजता नागपूरच्या दिशेने उडाले. या विमानाला नागपूर येथे पोहचण्यास नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत २४ मिनिटे विलंब झाला. तर फ्लाइट क्रमांक ६ई ७७४५ या नागपूर-इंदूर विमानाला ४४ मिनिटे विलंब झाला.

हेही वाचा : बुलढाणा जिल्ह्यातील १५ महसूल मंडळांत अतिवृष्टी; लाखो हेक्टरवरील पेरण्या धोक्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ एक्सप्रेसला १२ तास विलंब

मुंबईतील पावसामुळे सीएसटीएम- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस आज नागपुरात १२ तास विलंबाने पोहोचली. ही गाडी मुंबईहून (सीएसएमटी) येथून ७ वाजून ५ मिनिटांनी निघते आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी येते. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबई-नागपूर दुरांन्तो एक्सप्रेस सोमवारी नागपुरात चार तास विलंबाने पोहोचली. याशिवाय मुंबईहून नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या ३ ते ६ सहा तास विलंबाने धावत होत्या. यामध्ये एलटीटी-पुरी एक्सप्रेस, हटिया-एलटीटी एक्सप्रेसला विलंब झाला. तसेच सिकंदराबाद- हजरत निझामुद्दीन एक्सप्रेस, नवी दिल्ली- चेन्नई एक्सप्रेस, कटारा-चेन्नई या गाड्या नागपुरात उशिरा पोहचल्या.