अमरावती : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विद्यार्थिनीच्या बहिणीच्या तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्रतीक शरद हिवसे (२४) रा. लक्ष्मीनगर, अमरावती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मित्राचे नाव आहे. राठीनगर येथे भाड्याने राहणाऱ्या अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या खोलीत आढळून आल्याची माहिती ४ जून रोजी रात्री गाडगेनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्यांना तेथे प्रतीकसह त्याचा मित्र दिसून आला.
अनेकदा कॉल करूनही ती मोबाइल उचलत नसल्याने आपण मित्रासह तिच्या खोलीवर पोहोचलो. ती गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आल्यावर आपणच तिला खाली उतरविले, असे प्रतीकने त्यावेळी पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी प्रथम या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, शवविच्छेदन अहवालावरून घातपाताची शक्यता वर्तवून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. कारण, मृत विद्यार्थिनीच्या डोक्यात अंतर्गत दुखापत असल्याचे निरीक्षण शवविच्छेदन अहवालात नोंदविण्यात आले होते.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी मृत विद्यार्थिनीच्या बहिणीने थेट प्रतीक हिवसे यानेच तिची हत्या केली, अशी तक्रार पोलिसांत दाखल केली. काही दिवसांपूर्वीच मृत बहिणीने आपली प्रतीकसोबत मित्र म्हणून ओळख करून दिली होती, असे तिने तक्रारीत नमूद नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल झाला असला, तरी मृत विद्यार्थिनीच्या डोक्यात अंतर्गत दुखापत कशी झाली, तिच्या गळ्यावर चट्टे तसेच अन्य खूना कशाने आल्या, ते शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
बहिणीला सांगितले चुकीने कॉल लागला अन् कट केला…
चार जुनला दुपारी ३ वाजताच्या सुमारास तरुणीचा (मृत) तिच्या बहिणीला कॉल आला होता, त्यावेळी बहिणीला तिने सांगितले की, चुकीने कॉल लागला आणि लगेच कट केला. त्यानंतर तरुणीचे वडील तिला वारंवार कॉल करत होते मात्र ती उचलत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला कॉल करुन ती (मृत तरुणी) कॉल घेत नसल्याचे सांगितले. त्यानंतर मोठी बहिण तिच्या खोलीवर गेली, त्यावेळी तिला बहिणीचा मृतदेह जवळ घेऊन प्रतीक रडत असल्याचे तिला दिसले आणि जबर धक्का बसला. या प्रकरणात आता पोलिसांनी संबंधितांचे जबाब नोंदवून घेण्यास सुरूवात केली आहे.