नागपूर : महारेलतर्फे बांधण्यात येणाऱ्या नागपूर-नागभीड रेल्वे मार्गावर बगडगंज येथेत अंडर ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. हा अंडर ब्रिज भंडारा रोडला जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बगडगंज औद्योगिक क्षेत्रातील जागेची पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज केली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार आणि महारेलचे अतिरिक्त मुख्य प्रकल्प प्रबंधक सुशील शर्मा उपस्थित होते.
नागपूर -नागभीड रेल्वे मार्गाखाली महारेलतर्फे रेल्वे अंडर ब्रिज चे बांधकाम सुरु आहे. या अंडर ब्रिजला भंडारा रोडला जोडण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. या क्षेत्रात महापालिकातर्फे नागरिकांना भाडेपट्टीवर (लीज) जागा देण्यात आली असून एक १८ मीटर रस्ता सुद्धा विकास आराखड्यामध्ये (डेव्हलपमेंट प्लान) दर्शविला आहे. या रस्त्याला अंडर ब्रिजला जोडले तर नागरिकांना सुविधा प्राप्त होईल, असे महारेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी अंडर ब्रिजला जोडणारा पर्यायी मार्ग ही सुचविला.
आयुक्तांनी संबंधित विभाग आणि महारेल अधिकाऱ्यांना यासंबंधी संपूर्ण तपशीलासह प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. यानंतर आयुक्तांनी दही बाजार पूल पासून इतवारी रेल्वे स्टेशन साठी रॅम्प तयार करण्याच्या प्रस्तावाची पाहणी केली. महारेल तर्फे या मार्गावर तयार करण्यात येणारा ओव्हर ब्रिज आता दही बाजार रेल्वे ब्रिज सोबत जोडण्यात येणार असून नागरिकांच्या सुविधेसाठी इतवारी रेल्वे स्थानक कडे जाण्यासाठी रॅम्प तयार करावा लागेल. आयुक्तांनी यासंबंधात महारेल अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. या प्रसंगी सहायक आयुक्त विजय थूल, धनंजय जाधव, सहायक संचालक नगर रचना ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, पंकज पराशर, अश्विनी येलचेटवार, संजय माटे, तसेच गजानन वराडे, पुरषोत्तम फाळके, महारेलचे अभियंता सौरभ चौधरी आणि इतर उपस्थित होते.