नागपूरः नागपुरातील जेरील लाॅनमध्ये आयोजित नवरात्री गरबा उत्सवाच्या प्रवेशद्वारावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे वराहदेवाची प्रतिमा लावण्यात आली आहे. येथे प्रवेश करणाऱ्या तरुण-तरुणींना कुंकू लावण्यात येत असून आधार कार्डाची तपासणी केल्यावरच प्रवेश दिला जात आहे. मुस्लिम बांधवांचा प्रवेश रोखण्यासाठी हा प्रताप असल्याने नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

जेरील लाॅन येथे येशीव गरबा उत्सव समितीतर्फे गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या प्रवेशद्वारावरच विहिंप आणि बजरंगदलतर्फे वराहदेवाची मोठी प्रतिमा लावण्यात आली आहे. त्यास अभिवादन केल्यानंतरच तरुण-तरुणींसह नागरिकांना गरबा स्थळी प्रवेश देत होते. त्यापूर्वी कार्यकर्ते प्रत्येकाला कुंकवाचा टिळा लावून आधार कार्ड पाहिल्यानंतरच प्रवेश दिला जात होता. विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत गरबा मंडळांना वराहदेवाची प्रतिमा लावत प्रत्येकाला आधार कार्ड तपासून प्रवेश द्यावा असे मंडळांना सूचित केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ परिसरात येणाऱ्या जेरील लाॅन येथील नवरात्र उत्सवाच्या प्रवेशद्वारावर ही प्रतिमा लावून प्रत्येकाला कुंकू व आधार सक्तीने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे काय ?

विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे २० सप्टेंबरला नागपुरात झालेल्या पत्रपरिषदेत म्हणाले, काही विधर्मी वराहपासून घृणा करतात, त्यामुळे वराहदेवतेचा चित्र पाहून ते गरबा उत्सव मंडळापासून दूर राहतील. मुस्लिम तरुणांना डीवचण्यासाठी अशी मागणी करणे योग्य आहे का असा प्रश्न माध्यमाने विहिंप पदाधिकाऱ्यांना विचारल्यावर वराह देवता आणि नवरात्राचा तसा धार्मिक संबंध नसला, तरी ते आमचे देवता आहे, ते अवतार आहे आणि काही विधर्मीचे वराह दर्शन केल्याने धर्म नष्ट होते, त्यांचा धर्म खंडित होतो असा त्यांचा समज आहे, म्हणून आम्ही तशी अट घातल्याचादावाही विहिंपने केला. जे हिंदू धर्माला मानत नाही मूर्ती पूजेला मानत नाही, देवी मातेला मानत नाही, त्यांनी गरबा स्थळी प्रवेशच कशाला करावं, म्हणून आम्ही अशा सर्व अटी अट घातल्याचे विहिंपचे प्रशांत तितरे यांनी म्हटले.

भाजप महिला नेत्यांची उलट भूमिका…

भाजपशी संबंधित महिला नेत्यांकडून मध्य नागपुरात आमदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जाते. यंदा २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान रास गरबा व स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी प्रेस क्लबमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्या व माजी महापौर अर्चना डेहनकर म्हणाल्या, मुस्लिम महिला जर हिंदूत्वचा सन्मान करत असल्यास त्यांना प्रवेश दिला जाईल. त्यांना मुस्लिम म्हणून विरोध करण्याचा प्रश्नच नाही.