नागपूर : शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून घरासमोर ठेवलेली दुचाकीसुद्धा सुरक्षित नाहीत. गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत असलेले वाहनचोरी विरोधी पथक सुस्त पडल्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेऊन वाहनचोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा केला. मोहम्मद समीर अंसारी (२०) रा. टेका, विक्की डेहरीया (२२) रा. यशोधरानगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले.

शहरात वाहनचोरी वाढली असून गुन्हे शाखेचे वाहनचोरी विरोधी पथक फक्त वसुलीसाठी वाहनाचा वापर करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पथकाचे मुख्य काम सोडून कर्मचारी जुगार अड्डे, दारुचे गुत्थे, वरली-मटका संचालक आणि गांजा विक्री करणाऱ्यांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे वाहन चोरीच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहे. नेहरू कॉलनी, पेंशन नगर येथील रहिवासी तक्रारदार मो. ईकबाल (२८) यांनी दुचाकी जाफरनगरातील किराणा दुकानासमोर लॉक करून ठेवली होती. अज्ञात चोराने लॉक तोडून दुचाकी चोरली. ईकबालच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : फुटबॉल खेळताना मुलांमध्ये वाद, ठोसा मारताच एकाचा जागीच मृत्यू

गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटविली. तांत्रिक तपास आणि गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी समीरला ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता त्याने वाहन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने गिट्टीखदान परिसरातून एक स्कुटरही चोरी केल्याचे सांगितले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात बलराम झाडोकर, ईश्वर कोरडे, प्रवीण लांडे, विनोद गायकवाड, अनूप तायवाडे, मनीष रामटेके आणि अनिल बोटरे यांनी केली.

हेही वाचा : नागपूर : गँगस्टरवर मोक्का, इतर गुंड भूमीगत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉक तोडून बुलेट लंपास

दुसरी घटना धंतोली पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. नेताजी मार्केट येथील रहिवासी फिर्यादी मुकेश नेवारे (३७) यांनी घरासमोर बुलेट लॉक करून ठेवली. अज्ञात आरोपीने लॉक तोडून बुलेट चोरली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सापळा रचून आरोपी विक्की डेहरीयाला ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता बुलेट चोरीची कबुली दिली. दोन्ही आरोपींच्या ताब्यातून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले.