नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर नागपूर मध्य प्रदेशातील चोरट्यांचा गड बनत चालले आहे. शहरातील विविध भागांत घरफोड्या करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या आणखी एका आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. बुधवारी यातील तिघांना बेड्या पोलिसांनी ठोकल्या. हे तिघेही मध्यप्रदेश येथील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरलेली दुचाकी आणि दागीने असा ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोळीतील दोन चोर फरार आहेत. यात टोळीच्या म्होरक्याचाही समावेश असून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून तो टोळी चालवत होता.
शेरसिंग त्रिलोकसिंग चव्हाण, (वय २३ रा. उमरटी, जिल्हा. बलवाडी), दीपक सिंग केला सिंग बर्नाला (वय २४, रा. उमरटी), प्रकाश सिंग जगदीश सिंग कलमा (वय २०, रा. पलसूद, जि. बडवानी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत. हे तिघेही मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगार आहेत.
टोळीचा म्होरक्या गुरुचरण सिंग जुनेजा आणि मोहनसिंग नुर्बिनसिंग चावला हे दोघे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून ही टोळी चालवत होते. हे दोघेही सध्या फरार आहेत. चोरांच्या या आंतरराज्यीय टोळीने आतापर्यंत नागपुरातील इमामवाडा, सक्करदरा, कोतवाली अशा विविध पोलीस हद्दीत घरे फोडली आहेत. त्यांच्याकडून पोलीसांनी हस्तगत केलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी या चोरांनी अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर येथून चोरलेली आहे. चोरीच्या एका घटनेचा समांतर तपास करीत असलाना अंबाझरी पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या बांधल्या.
महिन्याभरातली दुसरी मोठी कारवाई
नागपूर पोलिसांनी महिन्याभरात चोरट्यांची दुसरी टोळी जेरबंद केली आहे. यापूर्वी १५ दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलिसांनी अशीच एक टोळी मध्यप्रदेशातून रॅकेट चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे.