नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला सुरक्षा देण्यासाठी लाखो रुपये घेणारे नागपूर शहर पोलीस कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली आहे. अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी बंदोबस्तातील तैनात पोलिसांच्या वेतनाचा लाखोंचा खर्च महापालिका उचलत आहे. मात्र, पोलीस विभागाने पोलीस ठाणे, पोलीस कर्मचारी वसाहतींचा सुमारे ३४ कोटींचा मालमत्ता कर थकवला आहे.
महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक दररोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात कारवाई करीत असते. दररोज सुमारे तीन ते चार ठिकाणी कारवाई करीत असते. त्यासाठी महापालिका मदतीसाठी पोलिसांचा बंदोबस्त घेते. महापालिकेने महिन्याला २४ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त घेण्याची मान्यता दिली आहे. त्यासाठी महापालिकेने निधीची स्वतंत्र तरतूद केली आहे. परंतु, महापालिका सरासरी वर्षभर ८ ते १० पोलीस कर्मचाऱ्यांची सेवा घेत आहे. सध्या महापालिकेची अतिक्रमण विरोधी विशेष मोहीम सुरू आहे. त्यासाठी १२ पोलीस कर्मचारी महापालिकेच्या सेवेत आहेत. यासाठी सरासरी ३० हजार रुपये प्रति पोलीस कर्मचाऱ्यांवर दर महिन्याला महापालिका खर्च करीत आहे.
अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी महिन्याला महापालिका तीन ते चार लाख रुपये खर्च करीत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर काही तासांत पुन्हा संबंधित पदपथावर अतिक्रमण दिसून येत असते. एकीकडे महापालिका अतिक्रमण काढण्यात सुरक्षा पुरवण्याच्या बदल्यात पोलीस खात्यांना मोबदला देते. मात्र, पोलीस खाते शहरातील त्यांचे पोलीस ठाणे, पोलीस कर्मचारी वसाहत आणि इतर कार्यालयांचा मालमत्ता कर भरण्यास कुचराई करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गंत येणाऱ्या पोलीस आस्थापनांचा ३४ कोटी ५८ लाख ५५ हजार ५२७ रुपये मालमत्ता कर भरलेला नाही.
थकीत मालमत्ता कर
शहरातील धंतोली पोलीस ठाणे (३ लाख ३९ हजार ३०१ रुपये), संगम ब्लॉक (२ लाख ९३ हजार ४०३ रुपये), बाबुलखेडा, रघुजीनगर-(९ लाख ८२ हजार ३३४ रुपये), सक्करदरा झोन : (७ लाख ६६ हजार ६०५ रुपये), हुडकेश्वर पोलीस ठाणे : (२ कोटी ९ लाख २२ हजार ३८४ रुपये), यशोधरानगर पोलीस ठाणे : (२ कोटी ४७ लाख ८१ हजार ५२५ रुपये), डीआयजी हाऊस, बोरगाव : (८ कोटी, ३१ लाख ३० हजार ९७९ रुपये), बोरगाव, पोलीस : (५ लाख ४४ हजार ८०४ रुपये), जिमखाना, तेलंगखेडी : (९ लाख १९ हजार ५९ रुपये), पोलीस लाईन टाकळी वसाहत- (५६ लाख ८१ हजार ५१९ रुपये), गोरेवाडा पोलीस वसाहत- (२० कोटी, ५२ लाख ९ हजार ४०४ रुपये), सिव्हिल लाईन्स डीसीपी कार्यालय २: (२२ लाख ८४ हजार २१० रुपये) यांच्याकडे मालमत्ता कर थकबाकी आहे, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे.