नागपूर : नागपुरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक आणि नैतिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणावर नव्हे तर वसुलीवर भर देत असल्याची चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. याच कारणामुळे पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील ६०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, हे विशेष.

शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी हा नेहमीचा विषय झाला आहे. कोंडी फोडण्यासाठी अनेकदा वाहतूक पोलीस हजर नसतात किंवा त्यांच्या जबाबदारीचा भाग नसल्याचे ते समजतात. वर्धा रोडवर जनता चौक, रहाटे कॉलनी, कृपलानी चौक, अजनी चौक, विमानतळ चौक, मध्य नागपुरात सीए रोड, उत्तर नागपुरात इंदोरा रोड, दक्षिण नागपुरात तुकडोजी पुतळा रोड, कॉटन मार्केट रोड, शनिवार बाजार, सक्करदरा चौक, महाल, दसरा रोड, रामेश्वरी रोड, मानेवाडा रोड, पश्चिम नागपूरमध्ये हिंगणा टी पॉईंट, वाडी चौक, याशिवाय सीताबर्डी, व्हेरायटी चौक इत्यादी भागात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
bogus police
‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही 
Nagpur police
‘मी पोलीस उपायुक्तांना गोळी घालणार…’ ‘त्या’ एका फोनने…

पोलिसांना या समस्येवर तोडगा काढता आला नाही. पोलीस गेल्या काही महिन्यांपासून चालान डिवाईस घेऊन रस्त्यावर उभे असतात. नियम तोडणाऱ्यांना थांबवून दंड आकारण्याची दमदाटी करतात. पण कारवाई न करता चिरीमिरी देऊन वाहन सोडून देतात. अनेकदा अशा घटनांच्या चित्रफिती प्रसारित होतात. वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात येतात. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेत अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली केली. दुसरीकडे दंडाच्या नावावर वसुली करण्याऱ्या तब्बल ६०० कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. एवढे सारे करूनही वाहतूक पोलीस कर्मचारी स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर देताना दिसत नाही. चालान करणाऱ्या डिवाईस मशीनचे ६०० ते ८०० रुपये वरिष्ठांना दिल्यानंतर चालानच्या नावावर बिनधास्त वसुली करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून याबाबत अनेकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी गेल्या आहेत. आयुक्तांना आता वाहतूक शाखेत मोठे बदल करण्याची वेळ आली आहे.

चलानची भीती उरली नाही

जानेवारी ते मे २०२३ यादरम्यान वाहतूक पोलिसांनी एकूण ४ लाख १८ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये ८४ हजार प्रकरणात तडजोडीअंती दंड वसूल करण्यात आला. पाच महिन्यात ४ कोटी ३५ लाखांचा महसूल दंडाद्वारे पोलिसांनी शासनाकडे जमा केला. मात्र, एवढी कारवाई करूनसुद्धा पोलिसांचा वाहनचालकांवर वचक नसल्याची स्थिती आहे. आजही जवळपास ४० टक्के दुचाकीस्वार विना हेल्मेटने फिरतात.

पाच महिन्यांतील कारवाई

हेल्मेट कारवाई – २,२६,४५४

ट्रिपल सीट – ९,२०१

सिग्नल तोडणे – २३,७३६

‘रॉंग साईड’ जाणे – २९१९

वेगात वाहन चालवणे – ९,४६६

शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. कार्यालये सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी निर्माण होते. मात्र, ती कोंडी फोडण्यासाठी अनेकदा आम्ही क्षमतेनुसार प्रयत्न करतो. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस नेहमी प्रयत्न करतात. – विनोद चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.