नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय नागपूर येथे आहे. या संघ भूमित बकरी ईदच्या तोंडावर पोलिसांनी गोवंश तस्करांची धरपकड सुरू केली आहे. सदर पोलिसांनी प्रतिबंधित गोवंश कत्तल, तस्करी, गोमांस विक्रीशी संबंधित सात जणांच्या टोळीला नागपूर शहरातून १५ दिवसांपासून हद्दपार केले आहे. त्यामुळे शहरातील गोमांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांनी पंधरा दिवसांसाठी शहरातून हद्दपार केलेल्या आरोपींमध्ये तनवीर कुरेशी वल्द सलीम हाजी कुरेशी (३४), मो. इरशाद वल्द अब्दुल वहाब ऊर्फ बादशहा कुरेशी (४४), साहेब ऊर्फ सोबी नुर कुरेशी (३५), मोहम्मद इमरान जाहिर कुरेशी (२७), राहील कुरेशी वल्द छोटू कुरेशी (३६), आसीब कुरेशी वल्द अजीब कुरेशी (३६), सरफराज हक उब्दुल हक (३५) सर्व राहणार गड्डीगोदामच्या वेगवेगळ्या भागात असे आरोपींचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपींनी गोवंशीय जनावरे कत्तल, तस्करी व वाहतुकीशी संबंधित टोळी तयार केली होती. या आरोपींमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. सोबत नागरिकांमध्ये जीवितास व मालमत्तेस त्यापासून धोका निर्माण झाल्याची भावनाही निर्माण झाली होती. हे सगळे आरोपी कायद्याला पायदळी तुडवत गोमांस विक्री करत होते. त्यांच्याविरुद्ध सदर व हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी दिवसेंदिवस वाढत होती. त्यांना पोलीस उपआयुक्त, नागपूर शहर यांच्या आदेशान्वये ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

बकरी ईदच्या तोंडावर त्यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. सदर पोलिसांनी हे आरोपी हद्दपार केलेल्या कालावधीत शहरात आढळल्यास त्यांची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यानंतर आरोपींवर कडक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

गड्डीगोदाम परिसरात ८ गोवंशीय जनावरे सोडवली

शहरात गोवंश तस्करीशी संबंधित सात जणांच्या टोळीवर १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्याची कारवाई झाली असतानाच सदर पोलिसांना गड्डीगोदाम परिसरातील रेल्वे रुळाजवळ रेल्वे भिंतीला लागून काही गोवंश जनावरे बांधून ठेवल्याचे कळले. या जनावरांजवळ चाऱ्याचीही सोयही नव्हती. पोलिसांनी परिसरात विचारणा केल्यावर ही जनावरे कुणाच्याही मालकीची नसल्याचे सांगण्यात आले. त्यावरून पोलिसांनी तेथून २ लाल रंगाच्या गायी, १ काळी रंगाची गाय, ५ गोरी अशा एकूम ८ जनावरे सोडवून त्यांना धंतोलीतील गोरक्षण केंद्रात दाखल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामठी कन्हानमधूनही अनेक जनावरांची सुटका

कामठी व कन्हान पोलिसांनीही कत्तलीसाठी ठेवलेली गोवंशिय जनावरे मोठ्या संख्येने सोडवल्याची माहिती आहे. याप्रसंगी ही जनावरे कत्तलीसाठी ठेवलेल्या काही आरोपींनाही अटक केली गेली. या जनावरांना शेवटी गोशाळेत पाठवले गेले.