नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख यांनी फॉरेन्सिक अहवालाचा उल्लेख करत धक्कादायक आरोप सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर केला आहे. त्यांनी सांगितले की, हा हल्ला ठरवून केलेला होता आणि या प्रकरणाला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्यात आला.
देशमुख म्हणाले की, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, दोन इसमांनी दगडफेक केली होती. एका इसमाने लहान दगड तर दुसऱ्याने मोठा, तब्बल १० किलो वजनाचा दगड मारला. त्यामुळे माझ्या गाडीची काच फुटली आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात नव्हता, तर हेतुपुरस्सर घडवलेली घटना होती, असा त्यांचा ठाम दावा आहे.ते पुढे म्हणाले की, या घटनेनंतर लगेचच स्थानिक पोलीस अधीक्षकांनी कोणताही तपास किंवा फॉरेन्सिक अहवाल न पाहताच, राजकीय दबावाखाली ही बाब सादर केली. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची थट्टा केली होती, या घटनेला ‘सलीम-जावेद’ची स्टोरी म्हटले होते. देशमुख यांनी यावर संताप व्यक्त केला आणि घटनेच्या गंभीरतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. देशमुख यांनी सांगितले की, दहा किलोचा दगड ही काही साधी गोष्ट नाही. हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि ते केवळ अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला.
“मी स्वतः गृहमंत्री राहिलो आहे. त्यामुळे मला पोलीस खात्यातून कागदपत्रे मिळणे अशक्य नाही. मला पोलिसांकडून मिळालेल्या फॉरेन्सिक अहवालात हे सर्व स्पष्ट नमूद आहे. मात्र, अद्यापही आरोपी सापडलेले नाहीत. यावर सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवे,” असेही ते म्हणाले.अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, “लवकरच मी फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर सादर करणार आहे. यातून सत्य बाहेर येईल आणि या हल्ल्यामागे कोण होते हेही उघड होईल. आता वेळ आली आहे की योग्य ती कारवाई करण्यात यावी.” या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सत्ताधाऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.