नागपूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा धोका अशी कारणे देत वाहतूक शाखेने खासगी ट्रॅव्हल्स बसेसना प्रवेश बंदी लागू केली. ज्यांच्याकडे वाहनतळाची सोय आहे, त्यांनाच शहरात प्रवेशाची परवानगी असेल, असे पोलीसांनी ठणकावले आहे. तर दुसरीकडे खासगी बस धारकांनी बुधवारी पोलीसांवर दबाव तंत्राचा अवलंब करत यू टर्न घेतला. दोन दिवसांत तोडगा काढा अन्यथा खासगी बससेसचे संचालनच थांबवू, असा इशारा खासगी ट्रॅव्हल्स असोसिएशने दिला.
एकीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसला शहरात प्रवेशावरून शिथीलता घ्यायला, वाहतूक शाखा तयार नाही तर दुसरीकडे तोडगा काढा अन्यथा बससेवा थांबवू, असे खासगी बस मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे खासगी बसने प्रवास करताना बसायचे कुठून आणि उतरायचे कुठे या कोंडीत प्रवासी अडकले आहेत. ज्यांच्याकडे वाहनतळाची सोय असेल त्यांनाच शहर प्रवेशाची परवानगी असेल. त्यांनाही वाहतळाशिवाय कुठेही प्रवासी उतरवता अथवा चढवता येणार नाहीत, असे वाहतूक शाखेचे म्हणणे कायम आहे. त्या आधारावर खासगी बस मालकांनी संघटनेमार्फत शहरात पाच थांबे मागितले होते. मात्र वाहतूक शाखेने ते मान्य केले नाहीत. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण वाढले आहे.
पोलिसांनी दिले हे थांबे
शहराबाहेर ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना उतरवणे अथवा चढवण्यासाठी पोलिसांनी थांबे दिले. यात वाहतूक शाखा अजनी झोनअंतर्गत वर्धा मार्गावरील चिचभुवन सर्व्हिस रोड, खापरी चौक, एमआयडीसी झोनमधील नागपूर रामरावती मार्गावरील आयुध निर्माणीचे शेवटचे गेट, इंदोरा झोनमधील छिंदवाडा मार्गावरील विद्यानगर मॉर्डन स्कूल, ढोके लेआउटमधील महाजन ट्रेडर्स, कामठी झोनमधील इंदोरा-कामठी दरम्यान जबलपूर मार्गावरील कापसी पूल बायपास, ट्रान्सपोर्ट प्लाझा व सक्करदरा झोनमधील उमरेड मार्गावरील बहादुरा फाटा, उमरगाव, बैद्यनाथ कंपनीशेजारील जागा व विहिरगावमधील प्रस्तावित खासगी बस थांब्याचा समावेश आहे.
१३ बस मालकांकडे स्वत:ची पार्किंग
शहरातील १३ बस मालकांकडे स्वत:ची वाहनतळे आहेत. हिंदुस्थान कॉलनीत बाबा ट्रॅव्हल्स, मानस रोडवरील एमपी बस स्थानक, ऑटोमोटिव्ह चौकाजवळील सैनी आणि विजेंद्र ट्रॅव्हल्स,माँ दुर्गा, यश, अंजनी, न्यू गुडविल, श्री साई, हंस, हिंदुस्तान, पवन आणि गणेशपेठ व बैद्यनाथ चौकाजवळील श्री ट्रॅव्हल यांच्या मालकीच्या त्या ठिकाणी वाहनतळ व्यवस्था आहे.
पहिल्याच दिवशी ११ गुन्हे ८ चलान
वाहतूक शाखेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पोलिसांनी पहिल्याच दिवशी अनधिकृत वाहन उभे केल्या बद्दल ११ खासगी बसधारकांवर गुन्हे दाखल करत ८ चालान कारवाई केली. यात एमआयडीसी वाहतूक परिमंडळ २ ने खडगाव टी पॉईंट वर सैनी आणि झिंक ट्रॅव्हल्स अशा दोघांना चालान दिले. सोनेगाव परिमंडळ १ ने सम्राट ट्रॅव्हल्सवर गुन्हा दाखल करत सैनी व मन्नत ट्रॅव्हल्स अशा दोघांना चालान दिले. लकडगंज परिमंडळाने पावर हाऊस चौकात उर्वशी ट्रॅव्हल्सवर गुन्हा नोंदवून केंकार, न्यू रॉयल, रिमेड आणि संजय ट्रॅव्हल्सला चालान बजावले. कॉटन मार्केट परिमंडळ ४ ने संत्रा मार्केट जवळ गुन्हा खुराना, डीएनआर, धनश्री, न्यू रॉयल व विजय ट्रॅव्हल्स अशा पाच जणांवर कारवाई केली. सदर परिमंडळाने एलआयसी चौकात रॉयल, अमिना, नटवर ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. सीताबर्डी विभागाने मानस चौक आणि कृपलानी अशा दोन ठिकाणी आमीना ट्रॅव्हल्सवर गुन्हा दाखल केला.
खासगी बस चालकांना पर्यायी थांबे देत पुरेशी मुदत दिली होती. खासगी बस कारवाईसाठी वाहतूक पोलिसांनी २१ पथके तयार केली आहेत. यात ७० पेक्षा अधिक कर्मचारी तैनात असतील. अंमलबजावणीदरम्यान ट्रॅव्हल्स जप्त होतील. भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि २२५ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. -लोहित मतानी, उपायुक्त वाहतूक शाखा