नागपूर : शहरातील लाखोंची उलाढाल होत असलेल्या देहव्यापाराचे लोण आता ग्रामीण भागातही आले आहे. ग्रामीण भागातील ढाबे, हॉटेल, फार्महाऊस आणि लॉजमध्ये देहव्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातून जवळपास 35 तरुणी-महिलांची देहव्यापारातून सुटका केली आहे. नुकताच केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगसा फाट्याजवळील ड्रिमविला लॉजवरील देहव्यापार उघडकीस आणल्यानंतर ही माहिती उघडकीस आली आहे.

नागपुरातील अनेक ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, स्पा, पंचकर्म, युनिसेक्स सलून, पब, बार, हुक्का पार्लर मोठमोठे हॉटेल्स आणि ओयोमध्ये देहव्यापार सुरु असतो. अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे घालून तरुणी आणि महिलांना देहव्यापाराच्या दलदलीतून बाहेर काढले आहे. शहरात देहव्यापाराच्या अड्यावर होणाऱ्या कारवाया बघता अनेक दलालांना ग्रामीण भागात आपले बस्तान बसवले आहे. त्यासाठी अनेक लॉज, हॉटेल्स, ढाबे आणि फार्महाऊस पार्ट्यांच्या संचालकांशी देहव्यापारातील दलालांना हातमिळवणी केली आहे. नागपुरातील अनेक दलालांना शहरातील तरुणी आणि महिलांना ग्रामीण भागातील लॉज आणि ढाब्यावर देहव्यापारासाठी करारबद्ध केले आहे. शहरात कारवाईची भीती असल्यामुळे अनेक तरुणी थेट ढाबे आणि लॉजवर देहव्यापार करण्यास प्राधान्य देत आहेत. केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगसा फाट्याजवळ असलेल्या ड्रिमव्हिला लॉजमध्ये देहव्यापार सुरु होता. तेथे अनेक महिला आणि तरुणी लॉजच्या स्वागत कक्षातच बसून आंबटशौकीन ग्राहकांशी संवाद साधत होत्या. नुकताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कोकाटे यांच्या पथकाने त्या लॉजवर छापा घातला. या छाप्यात एका महिलेला देहव्यापाराच्या दलदलीतून बाहेर काढले. अशोक केशव कारेमोरे (सावनेर), रमेश वासूदेव खुरसुंगे (सावनेर), प्रवीण अशोक कारेमोरे (सावनेर) यांनी आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये महिलांकडून देहव्यापास सुरु केला होता. त्यामुळे या लॉजमध्ये आंबटशौकीन ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.

हेही वाचा…नागपूर विमानतळ विकसित करण्यासाठी ७८६ हेक्टर जमिनीचे हस्तांतरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक स्थितीमुळे महिला देहव्यापारात

शहरातील आणि ग्रामीण भागातील गरीब घरातील किंवा असहाय्य असलेल्या महिला आणि तरुणींचा शोध दलाल घेतात. त्यांना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवतात. रात्रीच्या सुमारास अनेक महिला लॉज आणि ढाब्यावर देहव्यापार करण्यास तयार होतात. महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि विवाहित महिलासुद्धा देहव्यापार करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून वारंवार अशा लॉज आणि ढाब्यावर कारवाई केल्या जाते. मात्र, छापा घातल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा देहव्यापार फुलल्या जातो, हे विशेष.