नागपूर : भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाला महापुरुषांचे नाव देण्याची मागणी जुनी आहे. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नागपूर रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी सर्वप्रथम झाली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी झाली होती. त्यापाठोपाठ नागपूर शहर वसवणारे बख्त बुलंद शहा यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली होती. तसेच ताजउद्दीन बाबा यांचे नावे देण्याची मागणी देखील काही संघटनांनी केली आहे. आता राजे मुधोजी भोसले यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती राजे संभाजी महाराज भोसले यांचा इतिहास पुढे नेण्याचे काम नागपूर राज्य संस्थापक, हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांचे भारताच्या इतिहासात मोठे योगदान राहिले आहे. एक असे महान योद्धा ज्यांचा सर्व हिंदुस्थानात दरारा होता. ओरिसा, बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोंडवाना, महाराष्ट्र असा २,१७, ५६० चौसर किलोमीटर एवढे क्षेत्रात रघुजी महाराज यांचे शासन होते. नागपूरच्या राजे रघुजी भोसले यांची २१ वर्षांच्या पराक्रमी कारकीर्द होती. अशा पराक्रमी महायोद्धाचे नागपूर रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावे, अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. यासंदर्भातील पत्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठण्यात आले आहे.