नागपूर: नागपुरात ७ आणि ८ जुलैला पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी अनेक खोलगट भागात तुंबले होते. तर लहान- मोठ्या नाल्याला पुर येऊन हे पाणीही नागरिकांच्या घरात शिरून सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या नागरिकांना अद्याप मदतीचा पत्ता नाही. त्यातच तेथे काही नेत्यांकडून शासकीय मदत मिळवून देण्याचा दावा करत तब्बल २ ते ३ हजार रुपयांची पूरग्रस्तांकडून वसुली केली जात असल्याची माहिती आहे. याबाबत भाजपच्या उत्तर नागपुरातील नेत्यानेच धक्कादायक माहिती पुढे आणली आहे.
नागपुरात ७ आणि ८ जुलैला पडलेल्या पावसाच्या तडाख्यात उत्तर नागपुरातील हत्ती नाल्याला पुर येऊन हे पाणी आदर्श नगर, खोब्रागडे नगर, पंचशील नगर पंच कुवा, देवीनगर, यादव नगर, आणि संजय गांधी नगर या झोपडपट्ट्या परिसरात शिरले. त्यात परिसरातील अनेक लोकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. महागडे फ्रिज, पंखे, टीव्ही, कुलर या इलेक्ट्राॅनिक वस्तूंचे नुकसान झाले.
त्यानंतर तहसीलदार आणि नागपूर शहराचे एसडीओ यांना भारतीय जनता पक्षाचे उत्तर नागपूरातील पदाधिकारी अविनाश धमगाये यांच्या नेतृत्वात नुकसान भरपाईची मागणी केली गेली. त्यासाठी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याची विनंतीही प्रशासनाला केली गेली.
दरम्यान तहसीलदारांनी ११ जुलैला पटवारींना पत्र पाठवत तातडीने घटनास्थली जाऊन पंचनामाचे आदेश दिले. परंतु अद्यापही पंचनाम्याचा पत्ताच नाही. त्यानंतरही या परिसरात काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाईचे अर्ज वाटले जात आहे. या अर्जाचा तहसील कार्यालयासह एकाही शासकीय यंत्रणेशी संबंध नाही. उलट हे अर्ज वाटणाऱ्यांकडून संबंधित पुरग्रस्तांना शासनाकडून मोठी मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत दोन ते तीन हजार रुपये प्रत्येकी उकळले जात आहे.
या पैशासोबत संबंधिताकडून अर्जही भरून घेतला जात आहे. परंतु हे अर्ज शासनाच्या एकाही कार्यालयाशी संबंधित नसल्याचा आरोपही धमगाये यांनी केला. तातडीने या प्रकरणात कारवाई करून त्यातील दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
नागपूर महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन…
नागपूर महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून विविध भागात नागरिकांच्या भेटी- गाठी वाढवून विविध आश्वासनांची खैरात वाटणे सुरू झाले आहे. त्यापैकी काही उमेदवार हे बनावटी फार्म वाटून नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचीही शंका भाजपचे नेते अविनाश धमगाये यांनी वर्तवली. हा गंभीर प्रकार असून त्यांनाही नागरिकांचे २ ते ३ हजार रुपये घेण्याचे आधिकार दिले कुणी? हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत धमगाये यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदनही दिले आहे.