नागपूर : लक्ष्मीनगर येथील आठरस्ता चौकात ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशी रिलायन्स मार्टला भीषण आग लागली. यात कोट्यवधींचे साहित्य जळून राख झाले. या घटनेला अंबानींच्या रिलायन्स समुहाने केलेले बेकायदेशीर अतिक्रमण आणि नियम धाब्यावर बसवत तळमजल्यावर केलेला ज्वलनशील पदार्थांचा साठा कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे.
याच दोन प्रमुख कारणांमुळे २१ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊच्या सुमारास आगीचा भडका उडाल्याच्या आशयाची तक्रार योगीराज सुयोग पॅलेसमधील रहिवासी अनिल द्वारकादास गांधी यांनी बजाजनगर पोलिसांकडे केली आहे.
रिलायन्स समुहाकडून झालेल्या या बेजबाबदार वर्तणुकीमुळेच इमारतीतील नागरिकांचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याच्या प्रकरणात बजाजनगर पोलिसांनी रिलायन्स मार्ट सुपर स्टोअर विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
अग्निप्रतिरोधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने २१ ऑक्टोबरला आग लागली. त्यामुळे इमारतीतल्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे आगीत मोठे नुकसान झाले. आगीमुळे सदनिकेतील वायरिंग जळून राख झाली. वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्रणा आदी मौल्यवान वस्तू जळून राख झाल्या.
रिलायन्स समुहाच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी या प्रकरणात गांधी यांनी तक्रार केल्याने बजाजनगर पोलिसांनी रिलायन्स मार्ट सुपर स्टोअर मॉल विरोधात लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे तक्रारीत?
अनिल गांधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रिलायन्स समुहाने तळमजल्यावरील गोदामात टॉयलेट क्लिनर, गोडेतेल तसेच अन्य काही ज्वलनशील पदार्थांचा साठा केला होता. शिवाय समुहाने वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे भाजी-फळांचा स्टॉल लावला होता. विशेष म्हणजे, रिलायन्स समुहाने २०२१ नंतर कुठल्याही प्रकारचे ‘फायर ऑडिट’ही करून घेतलेले नाही.
वाहनतळाबाहेरील ‘फायर एक्झिट’ची मोकळी जागाही मालाचा साठा करत अडवून ठेवली होती. रिलायन्स मार्ट स्टोअर्सच्या अधिकाऱ्यांकडे या बाबत वारंवार लेखी, तोंडी पाठपुरावा करूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. रिलायन्सने वाहनतळावरील जागेत बेकायदेशीर स्टॉल उभारला नसता तर आग भडकलीच नसती. त्यामुळे या आगीला हा बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे.
निवासी भागातील मॉलवर प्रश्नचिन्ह
लक्ष्मीनगरातल्या आगीच्या घटनेनंतर शहरातल्या अन्य भागांमधील निवासी परिसरात उभारलेल्या व्यापारी संकुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. धरमपेठ, रामदासपेठ, सीताबर्डी, वर्धमानगर सारख्या गजबजलेल्या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुले आहेत.
तेथेही वाहनतळाच्या जागा बळकावून व्यापारी संकुलांनी अतिक्रमण केले आहे. शिवाय धंतोलीतल्या परिसरातील रुग्णालयांनी देखील वाहतनळांच्या जागांवर रुग्ण निवार, प्रयोगशाळा, एक्सरे सेंटर्स, औषधांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीची आणखी एखादी घटना घडल्यास मोठा हाहाकार होऊ शकतो.
