नागपूर : वर्दळीचा भाग असलेल्या चौकांमधली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिझर्व्ह बँक चौकापासून ते थेट काटोल नाका चौक, अजनी चौक ते थेट विमानतळ, रिझर्व बँक ते थेट ऑटोमोटिव्ह चौक असे उड्डाणपूल बांधले गेले. कोट्यवधींचा खर्च करीत हे उड्डाणपूल उभारले गेले. मात्र प्रत्यक्षात वाहतूक कोंडी फुटण्या एवजी नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँक ते सदर उड्डाणपुलाचे कस्तुरचंद पार्क समोरील लँडींगच चुकीचे आहे. त्यात नव्याने बांधलेल्या कामठी उड्डाण पूलाने डोकेदुखीत भर घातली आहे. ही एकट्या या भागाची समस्या नाही. तर अत्यंत वाहता रस्ता असलेल्या वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी, अजनी चौक आणि छत्रपती चौकातही हीच अवस्था आहे.

सदर, कामठी, अजनी उड्डाणपुलावरून शहराबाहेर जाणारी वाहने सुसाट वेगात पोचतात. मात्र पुलाखालील लिबर्टी टॉकिज चौक-गुरुगोविंद सिंह चौक, अजनी चौक, छत्रपती चौकातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम आहे. रिझर्व बँक चौकातून ज्यांना कामठीकडे जायचे , त्यांना कस्तुरचंद पार्कपासून वळण घेऊन एनआयटी समोरून पुन्हा एलआयसी चौकात यावे लागते. छत्रपती चौकात खासगी बस चालक अजनी उड्डाणपूल टाळत खालून वाहने चालवतात. त्यामुळे छत्रपती चौकात सायंकाळी कायम वाहतूक कोंडी होते.

सदर पुलाचे लँडीगच चुकीचे

रिझर्व्ह बँक चौकापासून सुरू होणारा उड्डाणपूल थेट काटोल नाका चौकापर्यंत सोडतो. मात्र सदर कडून येताना या उड्डांणपूलाचे लँडींग आणि मानकापूरकडे जाताना लिफ्टिंग सदोष आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. सदरपरिसरात हॉटेल, शाळा आणि अन्य आस्थापनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाहतूक कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पुलावरून मोठी वाहने जातात. मात्र पूल लांब असल्याने अनेक उड्डाणपूल टाळतात. काटोल रोड चौकाकडे जायचे तरी वाहनचालक खालच्या रस्त्याने गाडी चालवतात. त्यामुळे सदर, छावणी, राज्यपाल भवन चौकात वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस उड्डाणपुलाच्या दोन कोपऱ्यावर असूनही वाहतूक कोंडी ते फोडू शकत नाहीत.

नव्या उड्डाणपुलामुळे कोंडीत भर

कामठी मार्गावरील एलआयसी चौक, गड्डीगोदाम, इंदोरा, कडबी चौकातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलआयसी चौकातून थेट ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत नव्याने उड्डाण पूल बांधला गेला. हा उड्डाणपूलही सदोष आहे. कामठीकडे जाण्यासाठी वाहनचालकांना संपूर्ण वळण घेऊन एनआयटीकडून यू टर्न येत पुन्हा एलआयसी चौकात यावे लागते. त्यामुळे लिबर्टी चौकात वाहतूक कोंडी होते. ही या मार्गावरची कायमची डोकेदुखी आहे.

सिग्नवरचा कट बंदची नवी कटकट

शहरातला सर्वांत वर्दळीचा रस्ता वर्धा मार्गावर सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत वाहनांची गर्दी असते. या मार्गावर व्हिआयपी मुव्हमेंट अधिक असते. त्यामुळे रहाटे कॉलनी चौक, फॉरेन्सिक प्रयोगशाळा चौकातील कट सायंकाळी बॅरिकेड्स टाकून बंद केला जातो. वाहतूक कोंडीत ही नवी कटकट वाढली आहे. दिक्षाभूमीकडून अजनी रेल्वे स्थानक अथवा मेडिकलकडे जायचे असेल तर वाहन चालकाला जनता चौकापर्यंत यावे लागते. तेथून यु टर्न घेऊन पुन्हा रहाटे कॉलनी अथवा कारागृहा शेजारच्या नव्या मार्गाने जावे लागते. तिच अवस्था जनता चौकाकडून दिक्षाभूमीकडे अथवा गोवारी उड्डाणपुलावरून दिक्षाभूमीकडे जाणाऱ्या वाहनचाककांची होते. वाहनचालकांना अजनी पर्यंत अथवा मध्यवर्ती कारागृहा समोरील निरीच्या गेटसमोरून युटर्न घेत दीक्षाभीमिकडे जावे लागते.

भल्या पहाटे अपघात

सीताबर्डीत आदिवासी गोवारी उडानपुलावर सकाळी ५.४५ वाजता ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात भरधाव कारने मालवाहू वाहनासह दोन वाहनांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. पिंटू दाडे हे त्यांच्या टाटा झेस्ट कारने झिरो माइल्सहून रहाटे चौकात जात होते. आदिवासी गोवारी उडानपुलावर मागून येणाऱ्या काळ्या फोक्सवॅगन कारने ओव्हरटेक करताच ती समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कार उड्डाणपुलावर घसरली आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या कारशी आदळली. या अपघातात मालवाहू वाहनासह दोन्ही वाहनांचा पुढचा भाग पूर्णपणे खराब झाला. या अपघातात कार चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशासह तिघे जण गंभीर जखमी झाले.

सुधारणांसाठी ३४ कोटी वाढीव खर्च

सदर उड्डाणपुलाच्या डिझाइनमध्ये बदल करण्यासाठी महामेट्रोला ३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सुरुवातीच्या डिझाइननुसार, लिबर्टी टॉकीजमधून ‘वाय’ आकारात नवीन रॅम्प बांधला जाईल. जो एनआयटी समोरून खुल्या जागेतून मेट्रो पुलाखाली थेट कस्तुरचंद पार्कमध्ये उतरेल. तेथून ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनच्या मागून आरबीआय चौकाकडे जाऊन मुख्य रस्त्याला जोडेल. यामुळे कामठीकडे जाताना निर्माण होणारा ‘ब्लॉक’ दूर होऊन आणि लोक थेट कामठीकडे जाऊ शकतील.

रुग्णांचे होतात हाल

धंतोली परिसरात सर्वाधिक खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे वर्धेकडून येणाऱ्या रुग्णांना सायंकाळी रहाटे कॉलनी चौकातला कट बंद केल्याने जनता चौकापर्यंत जावे लागते. मेडिकलमधून भरती खासगीत भरती केलेल्या रुग्णांना जर रामदासपेठेत जायचे असेल तर त्यांना रहाटे कॉलनी चौक, दीक्षाभूमी चौकातला कट बंद केल्याने दूरपर्यंत वळणे घेऊन जावे लागते. यातून अत्यवस्थ रुग्ण दगावण्याची भिती असते. – निखीलेश सावरकर, स्थानिक निवासी, रहाटे कॉलनी

सिग्नल कायमस्वरुपी बंद

रहाटे कॉलनी आणि दीक्षाभूमीकडून अजनी रेल्वे स्थानकाकडे जाणारे दोन्ही सायंकाळी बॅरिकेड्स टाकून बंद करून ठेवले जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गाडी पकडण्यासाठी दूरचे वळण घ्यावे लागते. यातून गाडी सुटण्याची भिती असते.- अमित बोरकर, दीक्षाभूमी परिसर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँका, शाळा आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमुळे ऑफिस- कामावर पोहोचणे कठीण होत आहे. उड्डाणपुलाच्या चुकीच्या डिझाइनमुळे लोकांना रोजचा त्रास झाला आहे. प्रशासन आणि सत्ताधार्‍यांकडून दुरुस्तीची आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात स्थिति ‘जैसे थे’ राहते. – स्वप्नील भोगेकर, खासगी कर्मचारी