नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांनी शहरातील साफसफाईची व्यवस्था कोलमडल्याची टीका केल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत सक्रिय झाल्या असून सलग दुसऱ्या दिवशी ९२ सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगरला आहे. सोमवारी ४२ सफाई कामगारांवर कारवाई करण्यात आली होती.

महानपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी सफाईचे काम करणाऱ्या कामगारांच्या हजेरीची तपासणी केली. या पाहणीत गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक १९ मधील चिटणीस पार्क हजेरी स्टँडवर ८२ कामगार तसेच लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक ३६ मधील १० सफाई कामगार कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर असल्याचे आढळून आले. कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या या दोन्ही झोनमधील एकूण ९२ सफाई कामगारांवर १ हजार रुपयांचा दंड तसेच अर्धा दिवसाच्या वेतन कपातीचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी झोन अधिकाऱ्यांना दिले.

महापौर राहिलेल्या संदीप जोशी यांनी तीन दिवसांपूर्वी एका निवेदनाद्वारे महापालिकेच्या सफासफाई यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाची झोप उडाली. अतिरिक्त आयुक्त सोमवारपासून दौऱ्यावर निघाल्या आहेत. त्या विविध झोनमध्ये जाऊन सफाई कामगारांच्या उपस्थितीची पाहणी करीत आहेत. यात गांधीबाग झोनमधील चिटणीस पार्क हजेरी स्टँडवर एकूण कामगारांपैकी ८२ कामगार कोणतीही पूर्वसूचना न देताना गैरहजर आढळून आले.

या ८२ सफाई कामगारांवर १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा तसेच त्यांच्या अर्धा दिवसाचे वेतन कपातीचे निर्देश श्रीमती पंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देताना गैरहजर राहू नये, असे ताकीद या कामगारांना देण्यात येणार आहे. या आकस्मिक भेटीत १२ कामगारांनी रजेचा अर्ज दिल्याचे आढळून आले. या सर्व कामगारांच्या रजा मंजूर करण्यात आल्या किंवा कसे याची शहानिशा करण्याचे निर्देश पंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. या संदर्भतील अहवाल सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिल्याचे उपायुक्त राजेश भगत यांनी कळविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्ष्मीनगर झोनमध्ये १० कामगार गैरहजर

अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक ३६ मधील हजेरी स्टँडची आकस्मिक पाहणी केली. या हजेरी स्टँडवर एकूण ४६ कामगार हजर होते. कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर हजर नसलेल्या कामगारांची संख्या १० आढळून आली. या गैरहजर असलेल्या कामगारांवर १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात तसेच रजेवर असलेल्या ७ कामगारांची रजा मंजूर झालेली आहे काय, याची शहानिशा करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.