नागपूर : रेल्वेने मानवरहित रेल्वे क्रॉसिंग संपवण्याचा आणि त्यानंतर रेल्वे क्रॉसिंग ही संकल्पनाचा बाद करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गंत रेल्वे भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय मार्ग निधी या योजनेंतर्गत प्राप्त निधीतून ‘सेतूबंधन’ हा उपक्रम राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रेल्वे क्रॉसिंग बंद करत रेल्वे उड्डाणपुल व रेल्वे भुयारी मार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सेतूबंधन प्रकल्पांतर्गत रेल्वे उड्डाणपुलांचे बांधकाम हे ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेल या यंत्रणेकडून करण्यात येत आहे. सेतूबंधन उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण २५ रेल्वे उड्डाणपुल व भूयारी मार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्वत: रेल्वे काही ठिकाणी हे काम करत आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गंत गोंदिया ते गंगाझरी सेक्शनमध्ये एका रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे मेगा ब्लॉक घेण्याचे ठरवले असून १७ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता पासून १८ ऑगस्टला रात्री १२.३० वाजेपर्यंत नागपूर-हावडा मार्गावरील अप, डाऊन आणि तिसरी मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे रायपूर-इतवारी (नागपूर) पॅसेंजर गाडी १७ ऑगस्टला आणि इतवारी ते रायपूर पॅसेंजर गाडी १८ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असल्याने नागपूरमार्गे देशाच्या चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठी आहे. शिवाय मध्य भारतात खनिज साठे असल्याने आणि ते समुद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वेची तिसरी आणि चौवथी मार्गिका टाकण्यात येत आहे. नागपूर ते इटारसी, सेवाग्राम ते बल्लारशा आणि नागपूर राजनांदगाव तिसरी रेल्वे मार्गिका टाकण्यात आली आहे. आता नागपूर ते इटारसी आणि सेवाग्राम ते बल्लारशा चौवथी मार्गिका मंजूर झाली आहे.
नागपूर- वर्धा तिसरी लाईन ची खूप वर्षापूर्वी घोषणा केली गेली होती. कालांतराने गरजेनुसार येथे चौथी लाईनही घोषित करण्यात आली. सध्या या ७८ किमी मार्गाचे ३४ किमीचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते वर्धा दरम्यान दररोज मोठ्या संख्येने गाड्या धावतात. अशा परिस्थितीत येथे दोन लाईन पुरेशा नाहीत. त्यामुळे तिसरी आणि चौथी लाईन बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे.