नागपूर. राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात स्थापन विशेष तपास पथक पाळेमुळे खणत आहे. पथकाने आतापर्यंत घोटाळ्यात सहभागी २४ अधिकारी, मुख्याध्यापकांना अटक करीत प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. मात्र घोटाळ्याची राज्यभरातील व्याप्ती पाहता तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी हिरवा कंदिल दाखवला.

त्यामुळे केवळ नागपूर पुरते मर्यादित असलेले विशेष तपास पथक आता या घोटाळ्याची राज्यभरात पाळेमुळे खणून काढणार आहे. नागपुरातील परीमंडळ २ चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आता राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्यांचाही तपास होणार आहे. नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही बनावट शालार्थ ओळखपत्राशी निगडीत ३ गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे या घोटाळ्याशी निगडीत राज्यभरात दाखल होणाऱ्या सर्व गुन्ह्यांचा तपास एकत्रितरित्या करणे सुलभ व्हावे, यासाठी विशेष तपास पथकाच्या अधिकार चौकशीची कक्षा वाढविण्यात आली आहे. तपासपथकाचे प्रमुख या नात्याने गरजेनुसार तपास पथकात अन्य अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा अधिकार पोलीस उपायुक्त झा यांना बहाल करण्यात आला आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी त्याला मंजूरी दिली आहे. त्यामुळे या घोटाळ्याशी निगडीत राज्यभरातील गुन्ह्यांची सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू करावा आणि अहवाल सादर करावा, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी आदेश जारी केले.

अटक आरोपी संख्या दोन डझनावर

शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकासह सायबर शाखा देखील समांतर तपास करीत पाळेमुळे खणत आहे. या दोन्ही तपास यंत्रणांनी मिळून आतापर्यंत २४ जणांना अटक केली आहे. सायबर सेलने या प्रकरणात आतार्यंत ९ तर विशेष तपास पथकाने १५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक नरड, नाईक आणि वंजारी या तिघांवर दोन्ही तपास पथकाने संयुक्त कारवाई केली आहे.

हुकरेची नागपूर कारागृहात रवानगी

या घडामोडीत विशेष तपास पथकाने गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून ताब्यात घेतलेला शिवराम विद्यालयाचा मुख्याध्यापक धनराज हुकरे याची पोलीस कोठडी सोमवारी संपली. त्यावर पथकाने कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाला केली. मात्र घोटाळ्याशी निगडीत कागदपत्र पथकाने ताब्यात घेतल्याने कोठडीची गरज नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने हुकरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करत त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले.