नागपूर: एसटीच्या उत्पन्नाचा आलेख दिवसेंदिवस घसरत चालला असून एप्रिल महिन्यातील भाडेवाढीच्या पटीत उद्दिष्टांच्या प्रमाणे  प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६५ लाख इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र २९ कोटी ८० लाख रुपये इतके उत्पन्न  प्रतिदिन मिळाले असून ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित न केल्यास काय होईल, याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही धोरण राबवले जात नसून ऐन उन्हाळी हंगामात एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसातील आकडेवारीतून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून आले होते.पण त्या नंतरही प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी काहीही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. अनेक विभागात प्रवासी संख्या वाढीसाठी संधी उपलब्ध असताना  विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी निव्वळ दिवस ढकलताना दिसले. कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. आढावा घेण्यात आला नाही.परिणामी उत्पन्न व प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ झाली नाही.

१ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत उद्दिष्टा प्रमाणे दिवसाला साधारण तीन ते चार लाखांनी उत्पन्नात घट झाली असून प्रवासी संख्या सुद्धा गत वर्षीच्या तुलनेत दीड लाखाने कमी झाल्याचे दिसून आले आहे. ऐन उन्हाळी हंगामात व भाडेवढी नंतरही  उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली  असून आता उन्हाळी हंगाम फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. या महिन्यात एसटीच्या एकूण ३१ विभागांपैकी फक्त कोल्हापूर सांगली या दोनच विभागांना अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. आता यापुढे फक्त एक महिना उत्पन्न वाढीची संधी आहे. उष्णतेचा पारा वाढला असताना सुद्धा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीवाची पर्वा न करता चालक – वाहक व इतर कर्मचारी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत.अधिकारी मात्र अपेक्षित प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्या मुळे एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ स्वतः विशेष लक्ष घालून  एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा किंबहुना काम चुकार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून मोठी कारवाई करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.