नागपूर : बहुप्रतिक्षित नागपूर (इतवारी) ते नागभीड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी इतवारी ते उमरेड मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर दिवाळीपूर्वी नवीन रेल्वेगाडी सुरू केली जाणार आहे.

देशातून नॅरोगेज रेल्वे मार्ग संपुष्टात आले आहे. सर्वात शेवटचा नॅरोगेज मार्ग नागपूर ते नागभीड या मार्गाला ब्रॉडगेजमध्ये रुंपारित केले जात आहे. या मार्गाचे काम महारेल करत आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के वाटा आहे. या मार्गामु‌ळे नागपूरशी भंडारा, चंद्रपूर जिल्हा जोडला जाणार आहे. या मार्गावर उमरेड, भिवापूर, पवनी कॉम्पा, मोहाळी आणि नागभीड ही प्रमुख स्थानके आहेत.

नागपूर ते नागभीड हा १०६ किलोमीटरचा नॅरो गेज लोहमार्ग ब्रॉड गेज मध्ये रुपांतरीत करण्याचे काम गतीने पूर्ण होत असून, दिवाळीपूर्वी इतवारी ते उमरेड या ५१ किमी मार्गाची लोकार्पण होईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. महारेल कार्पोरेशनच्या कामाच्या आढावा घेण्यात आला. या बैठकीला महारेल कार्पोरेशनचे उपाध्यक्ष जैस्वाल, परिवहन विभागाचे उपसचिव किरण होळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इतवारी स्थानकापासून नागभीडपर्यंत सुमारे १०६ किलोमीटरचा नॅरो गेज लोहमार्ग ब्रॉड गेज मध्ये रूपांतरित करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश महारेल कार्पोरेशनला दिले आहेत. त्यापैकी इतवारी ते उमरेड या ५१ किलोमीटरच्या लोहमार्गाचे लोकार्पण दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. तथापि, या लोहमार्गाच्या नुतनीकरणामुळे १२-१४ छोट्या मोठ्या गावांना लोहमार्गाने नागपूर सारख्या महानगराशी जोडता येणार आहे.

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २०१६ मध्ये महाराष्ट्र शासन व केंद्रीय रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त भागीदारीतून महारेल कार्पोरेशन या संस्थेची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये राज्य शासन ची आर्थिक भागीदारी आहे, ते रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी महारेल कार्पोरेशन वर आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला ‘रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र’ हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील सर्व रेल्वे फाटकाचे रूपांतर रेल्वे उड्डाणपूल मध्ये करण्याची मोठी जबाबदारी महारेल कार्पोरेशनवर टाकण्यात आली आहे. हे रेल्वे उड्डाणपूल देखील गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी महारेल कार्पोरेशनला दिल्या.