नागपूर : नितीन गडकरी यांच्या वक्तव्यांमध्ये सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रोखठोक आणि सरळ बोलण्याचा स्वभाव. ते कोणत्याही विषयावर बोलताना राजकीय शिष्टाचारांचा बोजा वाहत नाहीत, तर मुद्द्याला भिडून वस्तुस्थिती स्पष्ट करतात.
प्रशासकीय अकार्यक्षमता, विकासकामातील विलंब किंवा निधीअभावाची कारणं यांचा ते थेट समाचार घेतात. विशेष म्हणजे, ते आपल्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी असोत की इतर राजकीय नेते, या सर्वांना ते सारख्याच थेट शब्दांत सुनावतात. गडकरींच्या भाषणांमध्ये “पक्षीय राजकारणापेक्षा काम महत्त्वाचे” हा संदेश नेहमीच ठळकपणे उमटतो. त्यांच्या रोखठोक शैलीमुळे कधी कधी स्वतःच्या पक्षालाही अस्वस्थ करणारे प्रसंग निर्माण होतात, पण त्यांची तीच खरी ताकद मानली जाते. कारण गडकरी नेहमीच कामगिरीवर भर देतात, सबबींना ते कधीही मान्यता देत नाहीत.
निधीअभाव, तांत्रिक अडथळे किंवा प्रक्रियात्मक गुंतागुंत यावर बसून राहण्याऐवजी पर्याय शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, त्यांची शैली म्हणजे एका प्रकारची ‘शिस्त लावणारी टीका’- ज्यात दोष दाखवून दिला जातो आणि त्यावर उपाय काय असू शकतो हेही स्पष्ट केले जाते. त्यामुळे गडकरींची भाषणं ही केवळ राजकीय प्रतिक्रिया राहत नाहीत, तर प्रत्यक्षात कार्यक्षमतेसाठी दिशा देणारी ठरतात. आता त्यांनी राजकारणात धर्म आणणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी अशा नेत्यांवर नाव न घेता टीका केली.
काय म्हणाले गडकरी?
धर्म आणि राजकारण एकत्र मिसळणारे नेते समाजात नेहमीच वादग्रस्त ठरतात. लोकशाही व्यवस्थेत धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय असताना, काही राजकारणी त्याचा वापर मतपेट्या भरण्यासाठी करतात. धार्मिक भावना भडकावून समाजात ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना बाधा आणतो. धर्माच्या नावाखाली मतं मागणे, विशिष्ट समुदायाला आकर्षित करण्यासाठी घोषणाबाजी करणे किंवा धोरणांवर धार्मिक रंग चढवणे या पद्धतींमुळे समाजात तणाव निर्माण होतो. अशा नेत्यांमुळे लोकांमध्ये विभाजन अधिक गडद होत जाते, तर खरा मुद्दा असलेला विकास, रोजगार किंवा शिक्षण दुय्यम ठरतो. या सर्व पार्श्वभूमीवर गडकरी यांनी नागपूरमध्ये महानुभाव पंथांच्या संमेलनात महत्वपूर्ण विधान केले.
गडकरी यावेळी म्हणाले, पंथ आणि संप्रदायांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे. धर्मकारण, समाजकारण आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सत्तेच्या हातात धर्म दिला तर त्याची हानी होते. मंत्री जिथे घुसतात तिथे ते आग लावल्याशिवाय राहत नाही. दोन महंतांमध्ये ते भांडण लावतात, मग तिथे गादीसाठी संघर्ष होतो. मग शासन स्थगिती देते, समिती नेमते आणि मग दोघेही शासनाकडे येतात, असे म्हणत गडकरींनी धर्म आणि राजकारण दूर ठेवण्याचा सल्ला दिला.