Nagpur Violence : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच नागपूरमध्ये १७ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल झाल्याची घटना घडली. नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. या घटनेमुळे नागपूरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. सध्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना एक सुनियोजित पॅटर्न दिसून येत असल्याचं मोठं विधान केलं. यानंतर आता विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केला आहे. “नागपूरातील हिंसा नियोजित कट होता, औरंगजेबाला मानणाऱ्या लोकांनी अफवा पसरवल्या”, असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलं?

“औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन करण्याचं नियोजित केलं होतं. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन देण्याचं ठरलं होतं, त्यानुसार आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं. मात्र, औरंगजेबाला मानणाऱ्या काही लोकांनी नागपूरात अफवा पसरवली. त्यांचा हेतू हा हिंसा करण्याचा होता. अशा जिहादी लोकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करत आहोत”, असं विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नागपूरमध्ये जी घटना घडली, त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. औरंगजेबाला मानणारे लोक आजही आहेत. अशीच परिस्थिती आम्हाला नागपूरमध्ये पाहायला मिळाली. नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. पण आमचं जे आंदोलन होतं, ते आंदोलन संपल्यानंतर विषय संपला होता. पण त्यानंतर नियोजित कट करून हिंसाचार करण्यात आला, हे सर्व प्लॅनिंग करून झालं. यामध्ये जे काही नुकसान झालं, त्या नुकसानाची भरपाई हिंसा करणाऱ्या लोकांच्या संपत्तीतून केली पाहिजे. ज्या-ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, नागपूरच्या घटनेत जे सामील होते त्या सगळ्यांकडून ही भरपाई वसूल केली पाहिजे. औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाहीत”, असं विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.