नागपूर – नागपूर जिल्ह्यातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले असून, यामुळे स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे. डिगडोह जागृती मंचाने नगर परिषद डिगडोहच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या गंभीर प्रकाराबाबत चौकशीची मागणी केली आहे.
मंचाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक १२ मधील प्लॉट क्रमांक १५ए या एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. या प्रकारामुळे मतदार यादीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता धोक्यात आली असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. मंचाने सांगितले की, ही बाब लक्षात आल्यानंतर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले असून, निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेकरिता सखोल चौकशी आवश्यक आहे.
डिगडोह जागृती मंचाचे पदाधिकारी म्हणाले की, “मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा पाया आहे. यादीतील त्रुटींमुळे निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तपासणी करून चुकीची नावे वगळावीत व आवश्यक ती दुरुस्ती करावी.”
दरम्यान, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही मतदार याद्यांतील अशा गोंधळांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मत चोरीच्या प्रकरणांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळण्यात आल्याचे समोर आले असून, त्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) चौकशी सुरू केली आहे. तपासात प्रत्येक मतदार नाव वगळण्याच्या अर्जामागे ८० रुपये दिल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणानंतर महाराष्ट्रातही मतदार याद्या शुद्ध करण्याची मागणी जोर धरत आहे. महाविकास आघाडी, मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच अनेक सामाजिक संस्थांनी राज्यपाल आणि राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत निवेदन दिले आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघात मत चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी त्यांच्या एका लेखात केला होता. राजुरा मतदारसंघातही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. येथे अचानक मतदार वाढले. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातही बोगस मतदार यादीत असल्याची तक्रार आहे.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने या सर्व तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
