नागपूर: विरोधी पक्षातील नेत्यांकडून नागपूरसह देशभरातील मतदार यादीतील घोळाबाबत सातत्याने वेगवेगळे आरोप केले जात आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी कामठी मतदार संघातील घोळाचाही उल्लेख केला होता. त्यामुळे मंगळवारी जाहीर झालेल्या नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीतील मतदार यादीबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. परंतु जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदार यादीत नोंद असलेल्या मतदाराबाबत महत्वाची माहिती दिली.

नागपुरातील नियोजन भवन येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डाॅ. विपीन इटनकर म्हणाले, नागपूर जिल्ह्यातही दोन अथवा जास्त ठिकाणी मतदान यादीत नोंद असलेल्याची माहिती प्रशासनाकडून मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मतदाराच्या यादीतील नावापुढे दोन स्टार चिन्हांकित केले जाईल. या मतदाराकडून आधीच हमीपत्र घेऊन कोणत्या ठिकाणी मतदान करणार, हे लिहून घेतले जाईल. त्याने तो एकाच ठिकाणी मतदान करेल. हमीपत्र न मिळालेला मतदार एखाद्या केंद्रात मतदानाला गेल्यास तेथे तो दुसऱ्या भागात मतदान करणार नसल्याचे लेखी घेतले जाईल. त्यानंतरच त्याला तेथे मतदान करू दिले जाईल, असेही डाॅ. इटनकर यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि १२ नगर पंचायती अशा एकूण २७ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीबाबतही त्यांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणतात निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज…

नागपूर जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि १२ नगर पंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका मुख्य, निर्भय व निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

साडेचार हजार अधिकारी- कर्मचारी…

नगरपरिषद व नगरपंचायतिच्या माध्यमातून ५४६ सदस्य निवडले जाणार आहेत. एकूण ३७४ प्रभाग असणार आहेत. प्रारूप मतदार यादीनुसार मतदारांची संख्या सुमारे सात लाख बत्तीस हजार च्या वर असणार आहे. २७ निवडणूक निर्णय अधिकारी तर २७ सहायक निवडणूक अधिकारी कार्यरत असणार आहे. सुमारे ४ हजार ४५५ अधिकारी व कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.