नागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांत तब्बल १३ वेळा श्वानांच्या चावण्याच्या घटना घडल्या आहेत. पाण्याचे मीटर रीडिंग घेण्यासाठी घराघरांत जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याने कंपनीने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पाणी बिल प्रचंड व्हायरल झाले होते. त्या बिलावर मीटर रीडिंगच्या छायाचित्राऐवजी एका श्वानाचा फोटो होता. या घटनेनंतर ओसीडब्ल्यूने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आणला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, मीटर रीडिंग घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अनेकदा घरातील पाळीव श्वान खुले असतात, ज्यामुळे मीटरपर्यंत पोहोचणे कठीण होते. काही वेळा श्वान आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांवर झडप घालतात. अशा १३ घटनांमध्ये कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे कंपनीने सांगितले. सर्व बाधित कर्मचाऱ्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
ओसीडब्ल्यूच्या म्हणण्यानुसार, काही नागरिक आपल्या घरात श्वान असतानाही कर्मचाऱ्यांना “श्वान नाही” असे सांगतात. त्यामुळे अचानक हल्ल्याच्या घटना घडतात. काही वेळा कर्मचाऱ्यांना श्वानांमुळे घरात प्रवेश न मिळाल्यास फाटकाबाहेरूनच मीटरच्या जागेचे फोटो घ्यावे लागतात. परिणामी कधी कधी मीटरच्या ठिकाणी श्वानाचे छायाचित्र घेतले जाते, आणि त्याचाच वापर बिलासाठी केला जातो. अशाच प्रकारचे एक बिल काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने पुन्हा एकदा नागरिकांना विनंती केली आहे की, मीटर रीडिंगसाठी ओसीडब्ल्यूचे कर्मचारी घरी आल्यास आपल्या पाळीव श्वानांना बांधून ठेवावे किंवा सुरक्षित स्थळी ठेवावे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कार्यसुविधा सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ओसीडब्ल्यूने पुढे सांगितले की, नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास मीटर रीडिंगची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूकपणे पार पाडता येईल. अन्यथा अशा घटनांमुळे केवळ कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येत नाही, तर रीडिंग आणि बिलिंग प्रक्रियेलाही विलंब होतो. त्यामुळे सर्व नागपूरकरांनी जागरूक राहून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.
