नागपूर : कधी काय घडेल हे सांगता येत नाही. रोजच्या कामाच्या सवयीतून कितीही सराव झाला तरी एखादी कृती अंगवळणी पडूनही गाफील राहणे किती महागात पडू शकते हे रविवारी घडलेल्या धक्कादायक घटनेतून समोर आले आहे. असाच अनावधानाने का होईना, अगदी छोटासा गाफिलपणा एका ४० वर्षीय महिलेसाठी जीवघेणा ठरला. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. रोजचा सराव असला तरी गाफील राहणे कसे मृत्यूला कारणीभूत ठरू शकते हे या घटनेवरून सिद्ध झाले. कोतवालीतल्या नवाबपुरा येथील भारत गादी हाऊसमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली.

गादी हाऊसमध्ये कामगार म्हणून काम करत असेलल्या कल्पना रुपचंद कामडी (४०) यांचा दुर्दैवी अंत झाला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते कापूस पिंजण्याचे काम करत आहेत. तरीही अनावधानाने झालेली एक चूक त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली.

नेमके काय घडले

मोहम्मद शेख रफिक शेख हे नवाब पुरातल्या मस्जिदजवळ भारत गादी हाऊस नावाने दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात जुनी मंगळवारी भागातील कल्पना रुपचंद कामडी या गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे कापूस पिंजण्याचे काम करतात. रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास कल्पना या नेहमी प्रमाणे कापूस पिंजत होत्या. कापूस पिंजण्याच्या मशीनमध्ये हाताने त्या कापूस भरत असताना बेसावध क्षणी त्यांचा हात मशीमध्ये अडकला. मशीनचा वेग अधिक असल्याने पाहता पाहता काही क्षणात त्यांचा संपूर्ण हात मशीनमध्ये जाऊन केसही आत ओढले गेले.

काही कळायच्या आत त्या केसाच्या बाजूने संपूर्णपणे मशीनमध्ये अडकल्या. यात त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने कापूस पिंजण्याच्या मशीनमध्ये रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. अंगावर शहारे आणणारी ही घटना उघडकीस येताच शेख यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. कोतवाली पोूतसांनी पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.