नागपुर : पुणे येथील श्वसनरोगावर काम करणारी सामाजिक संस्था आणि नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) श्वसनरोग विभागाकडून नागपुरातील ४ वर्षे ते ७ वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्य तपासणीचा अभ्यास करण्यात आला. त्यात ५ ते ७ टक्के मुलांमध्ये अस्थमाचे निदान झाले. ६ मे जागतिक अस्थमा दिन आहे. त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.
मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, काही वर्षांपूर्वी संशोधनात्मक प्रकल्पाअंतर्गत नागपुरातील उत्तर अंबाझरी मार्गासह इतर भागातील सुमारे ६ ते ७ शाळेतील ४ वर्षे ते ७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यात अस्थमासह इतरही प्रकारच्या वैद्यकीय तपासणीमध्ये सुमारे ५ ते ७ टक्के मुलांमध्ये अस्थमाचे निदान झाले. या मुलांच्या पालकांना उपचाराचा सल्ला दिला गेला. या आजारावर वेळीच निदान होऊन उपचार सुरू झाल्यास आजार गंभीर रूप धारण करत नाही. हा रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो.
विदर्भ चेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश स्वर्णकार म्हणाले, अस्थमाचे रुग्ण भारतात झपाट्याने वाढत असून जगात भारताचा या रुग्णसंख्येत (भारतात ३.५० कोटी रुग्ण) चौथा क्रमांक आहे. परंतु, या आजाराने होणाऱ्या मृत्यूत (भारतात वर्षाला २ लाख रुग्णांचा मृत्यू) मात्र भारत पहिला आहे. मानवी हानीसोबतच भारताला अस्थमामुळे हजारो कोटी रुपयांचा उपचारावरचा भुर्दंड पडतो. अस्थमावरील इन्हेलरचा उपचार प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क असायला हवा. त्यासाठी इन्हेलरची उपलब्धता व परवडणारी किंमत सुनिश्चित व्हायला हवी. सोबत या रुग्णांवर उपचारासाठी समाजासोबत सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचेही डॉ. स्वर्णकार म्हणाले.
संघटनेचे सचिव डॉ. नैनेश पटेल म्हणाले, तापात क्रोसिन तर अस्थमात इन्हेलरचा उपचार आवश्यक आहे. इन्हेलरद्वारे दिले जाणाऱ्या औषधांची मात्रा फार कमी राहत असून ती थेट फुफ्फुसात जाते. डॉ. समीर अरबट म्हणाले, इन्हेलरबाबात समाजात गैरसमज आहे. या आजाराचे लवकर निदान व उपचाराने क्रीडापटूही नियमित खेळून सामान्य आयुष्य जगू शकतो. डॉ. समीर राठी यांनीही आयएमए परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
गर्भवती महिला धूम्रपान करत असल्यास भ्रूूणावरही परिणाम
गर्भवती महिलेने धूम्रपान करणे धोकादायक आहे. या महिलेला गर्भधारणा झाल्यावरही धूम्रपान कायम ठेवल्यास तिच्या भ्रूणावर गंभीर परिणाम संभावतो. त्यामुळे तिला प्रसूती झाल्यावर होणाऱ्या बाळालाही अस्थमाचा धोका वाढतो. हा धोका धूम्रपान न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत सहा पटीहून जास्त राहत असल्याचेही डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले.
डॉ. राजेश स्वर्णकार काय म्हणतात…
अस्थमाच्या रुग्णांना नियमित इन्हेलरद्वारे उपचार लाभदायक आहे. प्राणायामसह इतरही पद्धतीचा उपचार करताना इन्हेलर घेणे फायद्याचे आहे. उपचार थांबवून इतर पद्धतीने उपचार घेणे धोकादायक ठरू शकते. कोणत्याही उपचार पद्धतीने अस्थमा पूर्णपणे बरा होत असल्याचे अद्याप कोणत्याही संशोधनातून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे योग्य उपचार घेणे फायद्याचे आहे, असे मत डॉ. राजेश स्वर्णकार यांनी व्यक्त केले.