नागपूर : कामठी हद्दीतल्या एका पेट्रोलपंपावर सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अचानक चाकूचा हल्ला चढवल्याने परिसरात एकच घबराट निर्माण झाली. या चाकू हल्ल्यात जखमी होऊनही प्रतिकार करणाऱ्या तरुणाने हल्लेखोरालाही चांगलीच चोप दिला. दोघांमधला सुरू असलेला हा रक्तरंजीत जीवघेणा खेळ पेट्रोलपंपावलील सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे. तो कोणीतरी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने कामठी परिसरातील खूनी हल्ले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाचा कारभार पाहणारे देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या बैठकीच्या निमित्ताने रविवारी नागपुरात उपस्थित असतानाही गुन्हेगारांवर अंकूश ठेवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून संताप व्यक्त होत आहे.

नितेश श्यामलाल सिरसाम (३३) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कामठीतल्या गवळीपूरा येथील रहिवासी नितेश हा मित्रासोबत बाहेर जात होता. गाडीतले इंधन संपल्याने तो बसस्थानकावजवळील ए. पी.च्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत होता. त्याच वेळी आशीष हुसैन मेंढे (३८) हा हरदास नगरातील हल्लेखोर हातात सुरा घेऊन नितेशच्या दिशेने धावला. काही कळायच्या आत आशीषने नितेशवर चाकू हल्ला चढवला.

जखमी अवस्थेत गाडी तशीच सोडून देत नितेशने हल्लेखोराला प्रतिकार करत त्याला चांगलाच चोप दिला.या हल्ल्यात नितेश सिरसाम याच्या मानेवर आणि पाठीवर चाकूचे वार बसल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेशची पत्नी अंजली यांनी दिलेल्या तक्रारीवरून कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोर आशिषला अटक केली. नितेशने आशीषकडून फेब्रुवारीमध्ये १० हजार रुपये उसने घेतले होते. त्यातूनच आशीषने हा खूनी हल्ला केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.