अमरावती : मराठा आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा चर्चेत आणून आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईच्या दिशेने निघाले असताना त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात वक्तव्ये केली जात आहेत. भाजपच्या नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मनोज जरांगे यांनी गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करायला नको, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन केले पाहिजेत. गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. महाराष्ट्रात खूप उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रात अत्यंत भक्तीभावाने साजरा केला जात आहे. मुंबईत संपूर्ण देशातील लोक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणी खूप गर्दी, उत्साह असतो. त्यामुळे हे अकरा दिवस मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये, गणेशोत्सवाचा कालावधी सोडून ते परत आपली मागणी रस्त्यावर आणू शकतात.
नवनीत राणा म्हणाल्या, मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंदूच्या या सणात विघ्न आणू नये. अकरा दिवसानंतर पुन्हा मागणी करता येऊ शकते. कोण हिंदुत्वादी आहे, हे कोणी ठरवू शकत नाही. हिंदूचे सण निर्विघ्नपणे साजरे करता यावेत, अशीच आपली भूमिका आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे येत्या २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यांनी राज्य सरकारला तसा इशारा दिला होता. मात्र, त्यांच्यात आंदोलनाला न्यायालयाकडून आणि पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. ‘तरीदेखील आम्ही मुंबईत धडक देऊ’, असा इशारा मनाजे जरांगे आणि त्यांच्यात समर्थकांनी दिलेला असतानाच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पोलिसांनी त्यांना एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. पोलिसांनी जरांगे यांच्या समोर इतरही काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत.
दुसरीकडे, मराठा समाज संघटनेतर्फे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लाखो मराठा बांधव विदर्भातून मुंबईला जाणार आहेत. ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी होती. त्यासाठी मुंबईकडे कूच करू. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा संकल्प विदर्भातील मराठ्यांनी केला आहे. सगे सोयरे हैदराबाद गॅझेट लागू करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला दोन हजार कोटी रुपये मंजूर करावेत, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत.