अमरावती : सध्या सर्वत्र मनवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवरात्रोत्सवात सर्वांचे मोठे आकर्षण असते, ते म्हणजे तरूणाईचे गरबा नृत्य आणि दांडिया.सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीही या उत्सवात सहभागी होत असतात. अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी गरबा नृत्य सादर केले, त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारीत झाला आहे. विशेष म्हणजे अमरावतीच्या महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनीही नवनीत राणा यांच्या सोबत गरबा नृत्य करून रसिकांचा उत्साह द्विगुणित केला.

ढोलाच्या तालावर थिरकत, तर कधी ट्रॅक्टर आणि नांगर हातात घेऊन शेतात उतरणाऱ्या नवनीत राणा यांचा हटके अंदाजातील ‘किसी के हाथ ना आएगी ये लड़की’ या श्रीदेवीच्या आयकॉनिक गाण्यावर केलेला डान्स ऑगस्ट महिन्यात गाजला होता. या व्हिडिओमध्ये त्या गुलाबी पंजाबी सूट परिधान करून, हातात पांढरी छत्री घेऊन आणि श्रीदेवीच्या ‘चालबाज’ (१९८९) चित्रपटातील ‘किसी के हाथ ना आएगी ये लड़की…’ या सुपरहिट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाल्या होत्या.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पर्वावर अमरावतीतील गरबाप्रेमींसाठी खास आकर्षण ठरलेल्या ‘परंपरा ग्रुप’च्या ‘अंबा महाकुंभ’ भव्य रासगरबा महोत्सवाचा शंकर नगर येथील भामकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ झाला. माजी खासदार नवनीत राणा, अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा आणि राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा मैदानावर गरबा रसिकांचा अलोट उत्साह दिसून आला. प्रमुख पाहुण्या नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून अंबा मातेची महाआरती केली. यानंतर, रासगरब्याचे सूर छेडले जाताच स्वतः नवनीत राणा आणि आयुक्त सौम्या शर्मा यांनी गरबा नृत्य करीत रसिकांचा उत्साह द्विगुणीत केला.

यावेळी, ‘परंपरा ग्रुप’चे तसेच नंदा प्रॉपर्टीचे ऋषभ मनोज भारानी, विकी खत्री, गुरुकृपा डेव्हलपरचे मनोज बख्तार, गोविंदा ग्रुपचे विजय तलडा, पंजाबी ढाब्याचे सरबजीत सलुजा, अडवानी ज्वेलर्सचे पियुष अडवानी, राजू अडगुलवार, आराधनाचे प्रतीक हबलानी आदींनी या भव्य आयोजनाचे कौतुक केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आयोजक सुनील राणा, नितीन अनासने, मनोज चांदवानी, राहुल बजाज, किशोर पिवाल, दिनेश सेठिया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका यांच्यासह अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. ‘अंबा महाकुंभ’च्या माध्यमातून गरबाप्रेमींना नऊ दिवस रासगरब्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.