नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र सर्व मतदार संघात सर्वेक्षण करण्यात येणार असून विजय हा निकष लावून जागा आणि उमेदवार निवड होईल. शेजारील राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही उमेदवारी देताना धक्कातंत्राचा अवलंब होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. तसेच नवाब मलिक यांच्याबद्दलचा विषय आता संपल्याचेही त्यांनी सांगितले.

सुयोग येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना पवार यांनी पक्षाची पुढील वाटचाल, महायुती सरकारच्या कारभाराबाबत आपली भूमिका मांडली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदावर असताना पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसलाच नंबर एकचा शत्रू मानत होते. त्यावरून दोन्ही पक्षातील संबंध दुरावल्याने काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यात नेतृत्वबदल करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात अहमद पटेल  यांच्याकडून राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि बाळासाहेब थोरात या तिघांपैकी कोणत्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्रीपदासाठी पसंती असेल अशी विचारणाही पवार साहेबांकडे करण्यात आली.

हेही वाचा >>> बाळासाहेबांनी तयार केलेली घटना पक्षाने पाळली नाही – राहुल शेवाळे; आमदार अपात्रता प्रकरणात उलट तपासणी पूर्ण

आम्ही कोणीही चालेल असे सांगितल्यावर काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव निश्चित केले हेते. पण याची कल्पना येताच पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला गेले. विमातळावरच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि नेतृत्वबदलाचा विचार मागे पडल्याचे पवार यांनी सांगितले.  

आजवरच्या वाटचालीत विलासराव देशमुख उत्कृष्ट मुख्यमंत्री होते. मात्र विद्यमान मुख्यमंत्र्यांशी आपले चांगले संबंध असून आम्ही महायुतीत सहभागी झालो त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थखाते सोडण्याची तयारी नव्हती. पण माझ्याकडे येणारी प्रत्येक फाइल ही  फडणवीस माजी मुख्यमंत्री असल्याने यांच्याकडूनच पुढे जाईल असे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते. त्यानुसारच फाइल माझ्या मंजुरीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.  तुमच्याही ८० वर्षांच्या काकांना रस्त्यावर आंदोलन करावे लागत आहे असे विचारता, आपण सातत्याने काकांना या वयात दगदग नको, घरात आराम करा असे सांगत होतो. पण ते ऐकतच नाहीत अशी मिश्कील टिपणी पवार यांनी केली.

हेही वाचा >>> रोहित पवारांसह त्यांचे सहकारी सरकारवर का संतापले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नवाब मलिक यांची भूमिका स्पष्ट नाही’

आमदार नवाब मलिक यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यांनी पाठिंब्याचे शपथपत्र दिले असल्याचे जे बोलत आहेत, त्यांनी ते कोणीही दाखवावे असे आव्हान पवार यांनी दिले. मलिक यांच्या बाबतीत भाजपचा गैरसमज झाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठविले पण आता हा विषय संपला असून  प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, मात्र नवाब मलिक यांना आरोपामुळे तुरुंगात जावे लागले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात त्यांना घेऊ नये ही भाजपची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.