अकोला : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन प्रकरण मुख्यमंत्री गंभीर म्हणत असतील तर समजून घेतले पाहिजे की ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे. कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारला पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. कुटुंबातील नातू अजित पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढला होता. कुटुंबप्रमुख व विचारधारा दोन्ही वेगवेगळे आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
अकोल्यात शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त आले असताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत सापडल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन प्रकरणात शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली. त्या समितीच्या चौकशीतून नेमके काय समोर येते, ते बघावे लागेल. या प्रकरणावरून भाजप अजित पवारांना घेरत असल्याच्या मुद्द्यावर बोलता येणार नाही.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार शेतकरी आहे. प्रश्न अनेक आहेत. सध्या देशात कर्जमाफीची चर्चा होते. २००४ साली देशाच्या कृषी क्षेत्राची जबाबदारी घेतली. तेव्हा यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याने अस्वस्थ झालो होतो. अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली. तेव्हा कर्जबाजारीपणा हे कारण समोर आले.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे हा मुद्दा मानला. शेतकरी आत्महत्या केलेल्या गावात गेलो. आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडून माहिती जाणून घेतली. मुलाच्या लग्नाच्या खर्चावरून शेतकरी अस्वस्थ झाले होते. त्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्ज कमी केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही, असा निष्कर्ष काढला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. आता अतिवृष्टी, दुष्काळ व कर्जमाफीच्या नावावर मोठमोठे आकडे दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.
शेतीवरील बोजा कमी करण्याची गरज
आज परिस्थिती बदलली आहे. देशात लोकसंख्या जास्त होत असताना शेती कमी होत आहे. विकास कामांसाठी शेतीची जमीन घेतली जाते. दिवसेंदिवस जमीन कमी होत आहे. १९४७ साली लोकसंख्या किती होती, आज लोकसंख्या प्रचंड वाढली. त्यातून शेतीवर बोजा वाढला. तो बोजा कमी करण्याची गरज आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
