अकोला : अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. सोलापूरमध्ये १० ऑक्टोबर रोजी आयोजित हिंदू आक्रोश मोर्चाच्या सभेत त्यांनी दिवाळीची खरेदी हिंदुंच्या दुकानातूनच करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून अकोल्यातील न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव जावेद जकरिया यांनी न्यायालयात धाव घेतली.
आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीच्या तोंडावर खरेदी केवळ हिंदूंच्या दुकानातूनच करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड देखील फुटले होते. राष्ट्रवादी पक्षाने देखील त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करून काढणे दाखवा नोटीस बजावली. तरीही आमदार संग्राम जगताप आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. राष्ट्रवादी अजित पवार गटातच आमदारांमध्ये मते-मतांतरे दिसून आले. या प्रकरणात अनेक ठिकाणी निषेध करून पोलीस तक्रारी देखील दाखल झाल्या.
आता हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे. एका विशिष्ट समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवणारे, तसेच दोन वेगवेगळ्या जाती-धर्मांमध्ये फूट पाडून सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने बेजबाबदार व उत्तेजक विधान केल्याचा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा परिणाम अकोला शहर व जिल्ह्यातही दिसून आला. या संदर्भात जावेद जकरिया यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तसेच जिल्हा पोलीस प्रशासन आणि विधानसभा अध्यक्षांकडे लिखित तक्रार दाखल केली.
मात्र, संबंधित आमदार सत्ताधारी गटातील प्रभावशाली नेता असल्याने तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जावेद जकरिया यांनी अकोल्यातील फौजदारी वकील ॲड. नजीब शेख यांच्या माध्यमातून अकोला न्यायालयात थेट फौजदारी खटला दाखल केला.
जकरिया यांनी त्यांच्या अर्जात आमदार संग्राम जगताप यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम १३६ (१) (अ) (ब)(क), कलम १३६ (२), कलम १९७ (अ) (ब) (क) (ड), कलम ३५६ (१) (२) (३) नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आता न्यायालयीन लढा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हा वाद उद्भवल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
