बुलढाणा : राष्ट्रीय चाचणी कक्षाने वैद्यकीय परिक्षेचा अर्थात ‘नीट’चा निकाल जाहिर केला आहे. अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा नगरीचा मूळ रहिवासी व सध्या वरवट बकाल येथील रहिवासी मानस महेश शेकोकार या देशात मागासवर्गीयातून ४५ वा आला आहे. लहानपणापासुन तल्लख बुध्दी, जिद्द, चिकाटी, मनाची एकाग्रता त्यामुळे विद्यालयीन जिवनात मानसने विविध स्पर्धेत बाजी मारुन यश संपादन केले. नुकताच जाहीर करण्यात आलेल्या वैद्यकीय पदवी प्रवेश नीट परिक्षेत राज्यातील अडिच लाख विद्यार्थी तसेच देशभरातील लाखो विद्यार्थ्यांपैकी एससी कोठ्यातून तो ४५ वा आला आहे.
टॉप २००० मध्ये त्याने १८१७ वी रँक प्राप्त केली आहे. ‘नीट’मध्ये मोठे यश मिळविणारा तो जळगाव जामोद विधान सभा मतदार संघातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.मानस च्या कौतुकास्पद कामगीरीची वार्ता समजताच पातुर्डा व वरवट बकाल दोन्ही गावात जल्लोष साजरा करण्यात आला. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मानस महेश शकोकार याने नागेश्वर महाराज विद्यालय वरवट बकाल या शाळेमधून त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे.
या यशाबद्धल मानस याने सांगितले की, नीटची परीक्षा हा एक आव्हानात्मक प्रवास होता. सातत्यपूर्ण कठोर परिश्रम, धोरणात्मक तयारी आई-वडिलांच्या अखंड पाठिंबामुळे हे शक्य झाले असल्याचे तो म्हणाला. तसेच हे यश केवळ आकड्यांचे नाही, तर अनेक वर्षाच्या अथक परिश्रमाचे, त्यागाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे माझे स्वप्न होते आणि त्यासाठी मी खूप कष्ट घेतले. माझ्या पालकांनी आणि शिक्षकांनी दिलेल्या पाठिंबा शिवाय हे शक्य नव्हते. आता माझ्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली आहे. असे मानस शेकोकार याने प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत बोलतांना सांगितले.
वडिल शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांनी, महेश शेकोकार यांनी सांगितले की मानसच्या यशामागे त्याची प्रचंड मेहनत आणि समर्पण आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले.
बुलढाण्याचा आदित्य जिल्ह्यात प्रथम
बुलढाणा येथील 4 विद्यार्थ्यांनी नीट २०२५ या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत टॉप रँक प्राप्त केले आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सीने काल अधिकृत निकाल जाहीर केला आहे. यात आदित्य डुकरे एआयआर ६५, गुण: ६५२, ओम टेकाळे –एआयआर १५७६, गुण: ५९७, दिशा बहेकर – एआयआर, ४३०६, गुण: ५७५, तनुजा कामलिक – एआयआर १९०१९, गुण: ५३७ यांनी यश मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन करीत जिह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
नीट ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी एजन्सी दरवर्षी आयोजित करते. ही परीक्षा भारतातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बिडीएस तसेच आयुष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. तसेच, जे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जायची योजना करतात, त्यांच्यासाठीही ही परीक्षा आवश्यक आहे